राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या कुरियर घेऊन जात असलेल्या व्यक्तीला मारहाण करून २४ लाख रुपये असलेली बॅग लुटणाऱ्या टोळीला यवत पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
ओंकार दिनकर जाधव ( वय २४ रा अकोळनेर, ता. नगर, जि. अहमदनगर ), अनिकेत गोरख उकांडे (वय २३ रा. अकोळनेर, ता. नगर, जि, अहमदनगर ), किरण रामदास गदादे (वय २३, रा, तांदळी, ता. शिरूर, जि. पुणे ), तेजस मोहन दुर्गे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, बारामती, ता बारामती, जि. पुणे ), गणेश बाळासो कोळेकर ( वय २०, रा तावरे वस्ती, सांगवी, ता. बारामती जि पुणे ) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे असून याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती दिली.
एसटी बस मधून पुण्याकडे जात असलेल्या खाजगी कुरियरच्या व्यक्तीला काही लोकांनी पाळत ठेवत एस टी मध्ये सहप्रवासी म्हणून बसले होते. गाडी यवत येथे येताच दोघांनी या कुरियर व्यक्तीला तु मुलींना का छेडतो असे ओरडून त्याला मारहाण करीत त्याच्या या ताब्यातील कुरियरची बॅगची चोरी केल्याची घटना ६ ऑक्टोंबर रोजी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या बॅगमध्ये २४ लाख रुपयांची रक्कम असल्याचे कुरियर कंपनीचे मालकाने पोलिसांना सांगितले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात यवत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक नेमण्यात आले होते. या पथकाने अवघ्या १५ दिवसात या गुन्ह्याचा उलगडा करीत या टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी केली. या प्रकरणी पोलीसांनी सोमवारी ( दिनांक २४ ) पाच आरोपींना ताब्यात घेतले असून प्रेमराज उत्तम ढमढेरे ( रा. तांदळी, ता. शिरूर, जि पुणे ) याच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची कबुली आरोपींनी दिली असून तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामती
अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे,विजय कांचन,अजित भुजबळ, अजय घुले, राजू मोमीन,दत्तात्रय तांबे, बाळासाहेब खडके, पोलीस शिपाई धिरज जाधव ,दगडू विरकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.