मुंबई : महान्यूज लाईव्ह
हातात पिस्तूल घेऊन दरोडेखोर बंगल्यात घुसला. बंगल्यातील तीन महिलांना धमकावून लुटालुट करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी परिसरात आलेले मंत्री दादा भुसे यांना ही माहिती मिळाली . ते कार्यकर्त्यांसह बंगल्यात आले. त्यांनी चोरट्याला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना मालेगाव येथे घडली आहे.
मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरात ही घटना घडली. दुपारी तीनच्या सुमारास या परिसरातील एका बंगल्यात एक चोरटा हातात पिस्तुल घेऊन घुसला. त्याने घरात असलेल्या तीन महिलांना पिस्तुलाचा धाक दाखवून दागिन्यांची मागणी केली. या महिलांनी केलेल्या आरडाओरड्यानंतर काही नागरिक तेथे जमा झाले.
पालकमंत्री दादा भुसे या वेळेसच याच परिसरात आले होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच तेदेखील तातडीने या बंगल्यात आले. त्यावेळी या चोरटयाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते. यानंतर दादा भुसे यांनी या चोरट्याशी संवाद साधून त्याला शरण येण्याची विनंती केली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर हा चोरटा खोलीबाहेर आला. त्यानंतर त्याला पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दिवाळीच्या सणामुळे नागरिक पुजेसाठी दागिने बॅंक लॉकरमधून काढून घरी आणत असतात. त्यामुळे ही वेळ साधून चोरटे त्या दागिन्यांची चोरी करतात. त्यामुळे याबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहनही मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केले.