बारामती : महान्यूज लाईव्ह
दरवर्षी वेळेत न येऊन रडविणाऱ्या पावसाने यावर्षी वेळेत न जाऊन शेतकऱ्यांना रडवले आहे.बारामती तालुक्यात तब्बल ३७४५ हेक्टर उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी व्यक्त केला आहे.
बारामतीच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सरासरी ३८९ मीमी ऐवढी असते. परंतू यावर्षी काही ठिकाणी या सरासरीच्या तिप्पट पाऊस पडला आहे. यातही दोन तीन दिवस किंवा एक आठवडा सलग पाऊस पडल्याने नुकसानीची तीव्रता वाढली. पीक काढणीच्या वेळी आलेल्या पाऊसाने हातचे पीक काढून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पाऊसानंतर कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ३७४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सर्वाधिक नुकसान कांदा आणि भाजीपाला पिकांचे झालेले आहे. यासोबतच सोयाबीन, ज्वारी, बाजरी, सूर्यफूलासह चारापिकांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही पाणी असल्याने नुकसानीचा अंदाज वाढण्याचीही शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.