मुंबई : महान्यूज लाईव्ह
अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप केला म्हणून तुरुंगात गेला. आता त्याला १५ दिवसासाठी तुरुंगातून घरी जाण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही १५ दिवसांची सु्ट्टी मागताना आरोपीने दिलेले कारण अजब आहे, जे न्यायालयाने मान्य केले आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. आरोपी राहूल बघेल हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी सध्या अलवरच्या तुरुंगात बंद आहे. त्याने आपली पत्नी गर्भवती व्हावी यासाठी आम्हा दोघांना एकत्र राहण्याची गरज आहे, यासाठी १५ दिवसाची रजा मिळावी अशी मागणी केली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. कोणताही गुन्हा केला नसताना कैद्याच्या पत्नीला तिच्या संततीच्या अधिकारापासून वंचीत ठेवले जात आहे. संततीच्या उद्देशाने दोषी बंदीवानास त्याच्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास त्याच्या पत्नीच्या अधिकारांवर विपरित परिणाम होईल, असे यावेळच्या युक्तीवादात म्हणले गेले.
यापुर्वीही जोधपूर उच्च न्यायालयाने ३४ वर्षीय बंदीवान नंदलाल याला याच कारणासाठी १५ दिवसांची संचीत रजा मंजूर केली होती. त्यावेळी ऋवेद या हिंदू धर्मग्रंथासह ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाममधील सिद्धांताचा हवाला देण्यात आला होता. कारावासामुळे कैद्याच्या पत्नीच्या लैंगिक आणि भावनिक गरजांवर परिणाम झाला आहे. १६ संस्कारांपैकी मूल होणे हा स्त्रीचा पहिला हक्क आहे. वंश जतन करण्याच्या उद्देशाने संतती असणे हे सर्वच धर्मग्रंथांनी महत्वाचे मानले आहे असे न्यायालयाने म्हणले होते.
आता पुन्हा अशाच प्रकारचा निर्णय देण्यात आला असून न्यायालयाचा आदेश अलवरच्या तुरुंगात पोचला आहे.