मुंबई : महान्यूज लाईव्ह
डेंग्यू झाल्याने रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णाला ब्लड प्लेटलेटऐवजी केमिकलयुक्त मोसंबी ज्यूस सलाईनव्दारे चढवला गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील एका खाजगी हॉस्पीलटमध्ये घडली आहे. यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला असून आता या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने दिले असून हॉस्पीटल सील करण्यात आले आहे.
या ३२ वर्षाच्या महिलेला डेंग्यू झाल्याने प्रयागराजच्या ग्लोबल हॉस्पीटल व ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्लड प्लेटलेट कमी झाल्याने रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना प्लेटलेटच्या बॅग आणण्यास सांगितल्या. नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयातून या प्लेटलेटच्या बॅग विकत घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. या बॅगवरही या प्लेटलेट असल्याची नोंद होती. यातील द्रव सलाईनद्वारे रुग्णाच्या शरिरात सोडण्यात आला. काही वेळातच रुग्णाची अवस्था गंभीर झाली, तोपर्यंत तीन बॅगमधील द्रव रुग्णाच्या शरीरात सोडण्यात आला होता. यानंतर रुग्णाची गंभीर अवस्था पाहून हा द्रव सोडण्याचे बंद केले. परंतू रुग्णाची तब्येत बिघडतच गेली आणि काही काळातच या रुग्ण महिलेचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी उर्वरीत बॅगची लॅबरोटरीमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये ब्लड प्लेटलेट नसून केमिकलयुक्त मोसंबी ज्यूससारखा गोड द्रव असल्याचा अहवाल लॅबरोटरीने त्यांना दिला आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांना या सगळ्या प्रकाराचा मोठा धक्का बसला असून या प्रकारणी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उत्तर प्रदेश सरकार प्रशासनानेही आता याबाबत चौकशीचे आदेश दिले असून रुग्णालय सील करण्यात आले आहे.