विक्रम वरे
बारामती : महान्यूज लाईव्ह
दिवाळीचे औचित्य साधून बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावेत या उद्देशाने पवार कुटुंबाकडून शारदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यंदाच्या शारदोत्सवात बारामतीकरांना भक्तिसंगीतासह स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताच्या सर्वांगीण प्रगतीची गाथा सांगणारी सांगीतिक मेजवानी मिळणार आहे.
शनिवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी अशोक हांडे यांचा ‘आजादी ७५’ हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात जी स्थित्यंतरे झाली त्याची सांगीतिक मांडणी या कार्यक्रमात अशोक हांडे व त्यांचे सहकारी करणार आहेत. अत्यंत भव्य असा हा कार्यक्रम असून, तब्बल १५० कलाकार यात सहभागी होणार आहेत.
रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी प्रा. राजेश सरकटे निर्मित ‘गजर विठ्ठलाचा’ हा भक्तिगीतांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. यात विविध भक्तिरसांचा आविष्कार रसिकांना अनुभवता येईल.त्यानंतर लगेचच धनश्री खंडकर व अक्षय शिपी हे मुंबईची कहाणी दास्तान-ए-बड़ी बांका या कार्यक्रमाच्या माध्यमातून बारामतीकरांसमोर सादर करतील. अक्षय शिपी याला सांस्कृतिक क्षेत्रातील शरद पवार फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. त्याच्या कलेच्या सादरीकरणास शारदोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असेल. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात रात्री आठ वाजता है कार्यक्रम होणार आहेत.
अभिजात संगीत परंपरा हा भारतीय कलासंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे, अभिजात संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण व्हावी व या संगीताला संपन्न रसिकाश्रय लाभावा, हा यामगील प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे व श्रीनिवास पवार यांनी केले आहे.