राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
भीमा पाटस सहकारी कारखाना हा यंदाच्या गळीत हंगामात सुरू होत आहे त्याचे आम्ही स्वागतच करू, पण या कारखान्यावर शंभर कोटीच्या वरती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत. हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे याची जाणीव कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल व संचालक मंडळाने ठेवावी. सहकारी असलेल्या या कारखान्याचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास मात्र आम्ही तीव्र विरोध करू, असे स्पष्ट मत दौंड चे माजी आमदार आणि भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
मागील सलग तीन वर्षापासून भीमा पाटस सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम बंद होता. त्यामुळे हा कारखाना बंद असल्याने या कारखान्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक कामगारांचे संसार हे उघड्यावर आले होते. भीमा पाटसवर विविध बॅंकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज असल्याने व कारखाना बंद होण्यास कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हेच जबाबदार असल्याची टीका विरोधांकडून सातत्याने होत होती. मात्र गुरुवारी (दि २०) भीमा पाटस कारखान्याचा गळीत हंगाम यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली. यावर आमदार कुल यांचे विरोधक मानले जाणारे माजी आमदार रमेश थोरात यांनी यंदाचा गळीत हंगाम सुरू होत असल्याने त्याचे आम्ही स्वागतच करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर अधिक बोलताना थोरात म्हणाले की, मुळात हा कारखाना बंद का पडला ? खरं तर कारखाना बंद होयलाच नव्हता पाहिजे. या कारखान्यावर जिल्हा बँकेचे १७२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय इतर अनेक बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्जही आहे. हे कर्ज फेडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी टाकून कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी ३६ कोटी रुपये घेतले. हे ३६ कोटी घेऊन ही हा कारखाना तीन वर्षे बंद का ठेवला. हे ३६ कोटी रुपये गेले कुठे याचे उत्तर कुल यांनी शेतकऱ्यांना द्यावे. १९० एकरावर उभा असलेला हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शंभर कोटी रुपयांच्या वरती शेतकरी सभासद व कामगारांच्या ठेवी आहेत. हा कारखाना सहकारी तत्त्वावरच चालू करावा. त्याचे खाजगीकरण करु नये, या कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद व कामगारांना बोलण्याचे अधिकार व स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांना कारखान्यात जाता येता आले पाहिजे त्यांची पिळवणूक होता कामा नये. अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व रास्त बाजार दर द्यावा व कामगारांची थकीत पगार व इतर देणे द्यावीत अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात यांनी केली.