बारामती – महान्यूज लाईव्ह
बुधवारी रात्री बारामती शहराला मुसळधार पावसाने झोडपले. या पावसात रस्त्यावर तर पाणी आलेच, मात्र सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले.. या पाण्याचा प्रवाह तांदूळवाडीतही विविध ठिकाणी होता.. मात्र यातही जेव्हा पाण्याचा लोंढा तांदूळवाडीच्या ज्येष्ठ नागरिक निवासापर्यंत पोचला.. तेव्हा मात्र देवदूतांचे धावून येणे त्या ३७ ज्येष्ठांसाठी मोठा आधार होता..
बुधवारी रात्री तांदूळवाडी येथेही मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाच्या पाण्याने वेगात येऊन येथील ज्येष्ठ नागरिक निवासातील काही खोल्यांना वेढा दिला. अचानक बाहेरच्या बाजूला मांडीपर्यंत पाणी आल्याने कोणालाच काही सुचेना.. पहावे तिकडे पाणी असल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाजही येईना..
त्याचवेळी या ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये पाणी शिरले असल्याची व तेथे काही ज्येष्ठ नागरिक अडकले असल्याची माहिती थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मिळाली. अजितदादांनी तत्क्षणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांना निरोप दिला. त्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. इकडे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनीही याची माहिती घेत सहायक फौजदार अनिल ओमासे, होमगार्ड प्रभाकर शिंदे व सहकाऱ्यांना तेथे पाठवले.
जय पाटील हे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अगदी काही क्षणातच तेथे पोचले. मुख्य रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह एवढा होता की, तेथून ज्येष्ठ नागरिक निवासात शिरणे शक्यच नव्हते. अशावेळी पाटील यांनी दोर मागवला व दोराच्या सहाय्याने ओढ्याला ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी पाण्याच्या वेगाची पर्वा न करता थेट ज्येष्ठ नागरिक निवासात जाऊन मदतकार्याला सुरवात केली.
तोपर्यंत ओमासे व शिंदेही तेथे पोचले. जय पाटील यांनी या सर्वांच्या मदतीने ज्या खोल्यांमध्ये पाणी शिरले होते, तेथील ३७ ज्येष्ठांना सर्वप्रथम आधार दिला. मग त्यांना लागलीच सुरक्षित स्थळी नेऊन पोचवले.
या ज्येष्ठांना जेथे उंचावरच्या ठिकाणी खोल्या होत्या, तेथे ज्येष्ठांना सुखरूप हलवून तेथील पाण्याच्या पातळीवर त्यांनी देखरेख ठेवली. काही क्षणांचाच हा आधार ,मात्र त्या ज्येष्ठांसाठी कमालीचा सुखदायक ठरला.
जय पाटील हे तांदूळवाडीचेच माजी सरपंच आहेत, त्यामुळे ते तेथे धावून जाणे हे तर घरचाच आधार होते, मात्र त्यातही त्यांना येथील सर्व बारकाव्यांची माहिती असल्याने तेथे जीव धोक्यात घालून त्यांनी तत्परतेने आत प्रवेश मिळवला व अगदी ऐनक्षणी ज्येष्ठांना मदत मिळाली. कारण पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे काही वेळात काहीही घडू शकले असते.
रात्रीच्या वेळी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे व मदतीचे पोलिस अधिकाऱ्यांनीही कौतुक केले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक घुगे यांनीही पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकही तेथे पोचले व त्यांनीही मदतकार्यात भाग घेतला.