प्रदीप जगदाळे – महान्यूज लाईव्ह
बारामती – दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात कऱ्हा नदीला पूर आला होता. त्यातच माळेगावचा वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी पात्रातील पाण्यात उतरुन वीज वाहिनीची दुरुस्ती करत वीजपुरवठा सुरु केला. या धाडसी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माळेगाव (ता. बारामती) येथील 33 केव्ही उपकेंद्राला होणाऱ्या वीज वाहिनीवर दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. विजेच्या कडकडाटामुळे या उच्च्दाब वाहिनीवरील तीन इन्सुलेटर फुटले होते. बऱ्याच शोधानंतर हा फॉल्ट कऱ्हा नदीच्या पात्रात असलेल्या वीजखांबांवर सापडला. इन्सुलेटर बदलल्याशिवाय माळेगावचा वीजपुरवठा सुरु होत नव्हता.
तेव्हा शाखा अभियंता रोहित राख यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचारी नवनाथ गावडे ,राजु इंगळे,निलेश होले,संकेत साळुंखे ,उमेश पैठणकर,विजय वाबळे ,किरण खोमणे ,अक्षय जाधव
यांनी पात्रात उतरुन तिन्ही इन्सुलेटर बदलले आणि वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणच्या या धाडसी कर्मचाऱ्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.