बारामती – महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत माळेगाव कारखान्याला नवी १० गावे जोडण्याच्या निर्णयावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली. त्यानंतर अभूतपूर्व गोंधळ झाला. गोंधळात सत्ताधाऱ्यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले, तर विरोधकांनी प्रतिसभा घेत हा ठराव नामंजूर केला.
माळेगा कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी १० गावे जोडण्याचा केलेला पोटनियम दुरुस्तीचा ठराव साखर आयुक्तालयाने काल फेटाळला. या वार्षिक सभेकरीता साखर आयुक्तालयाने काही निरीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये या निरीक्षकांनी हा ठराव मंजूरच झाला नाही. सभागृहापुढे मा्ंडला गेला नाही. बहुसंख्य लोकांनी त्याला नाकारले. छोट्या गटाने मंजूर मंजूर करून ते निघून गेले असा अहवाल दिला होता. तो अहवाल साखर आयुक्तालयाने स्विकारला.
काल हा ठराव साखर आयुक्तालयातील प्रादेशिक सहसंचालक श्री. डोईफोडे यांनी फेटाळला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे माळेगाव कारखान्याला १० गावे जोडून घेण्याच्या राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी पडले असून आता या आदेशावर राष्ट्रवादीचे संचालक मंडळ काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माळेगाव कारखान्याला १० गावे जोडण्यावरून माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व भाजपचे पदाधिकारी या विषयावर आक्रमक होते. दरम्यान रंजन तावरे यांनी वार्षिक सभा ही सुपर पॉवर असते, त्यामुळे वार्षिक सभेने हा ठराव नाकारला असल्याची माहिती दिली.