नायक- बारामतीच्या समृध्दीचे- भाग १
घनशाम केळकर, बारामती.
आपल्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधील सगळे गुण ओळखून त्याला जगण्याच्या परिक्षेत यशस्वी होण्याची शिकवण आजची आपली शिक्षणपद्धती देऊ शकते का? हा प्रश्न मनात येण्याचे एक विशेष कारण आहे. शिक्षणासाठी पंधरा, अठरा, वीस वर्षे दिल्यानंतरही बेकारीचा बिल्ला लावून फिरणारे लोक आपल्याला आज आजुबाजूला दिसतात.
त्याचवेळी एक दहावी नापास पोरगा शुन्यातून सुरवात करून करोडो रुपयाचा उद्योग उभारतो. मॅनेजमेंटमधला ‘ म ‘ देखील न शिकता पंधरा सोळा कामगारांची टीम लीड करतो आणि बारा, पंधरा हजार समाधानी ग्राहक जोडतो. या युवकाचे नाव आहे अतुल महादेव बनकर..!
आजच्या आपल्या शिक्षणव्यवस्थेने त्याच्यावर नापासाचा शिक्का मारला असला तरी जगण्याच्या परिक्षेत त्याने उत्तम मार्क मिळविलेले आहे. अवघ्या ८ वर्षात अतुल आणि त्याचा भाऊ अविनाश यांनी उभ्या केलेल्या वेदांत ग्राफिक्स या फ्लेक्स प्रिंटींगपासून सुरुवात करून जाहिरातीच्या विविध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या संस्थेने मोठी झेप घेतलेली आहे.
बारामती शहरातील पाटस रोडवर पांढरीच्या महादेवाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वीस बावीस वर्षापूर्वी एक सायकलचे दुकान होते. हे दुकान अतुलच्या वडिलांचे होते. पुढे त्या जागेवर बिल्डिंग बांधण्याचे ठरले. अतुलच्या वडिलांना ती जागा सोडून द्यावी लागली.
तिथे बिल्डींग उभी राहिली. पण त्या बिल्डिंगमधील गाळा भाड्याने घेण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती. अखेर त्यांनी आपला व्यवसाय स्वत:च्या घरी सुरु केला. मात्र आज त्याच बिल्डिंगमध्ये अतुलच्या वेदांत ग्राफिक्सचे स्वत:चे सहा गाळे आहेत. याखेरीज आणखी दोन गाळे भाडेतत्वावर घेतले आहे. याच बिल्डिंगमधील एक फ्लॅटही अतुलने त्याच्या व्यवसायासाठी घेतलेला आहे.
अतुलने ज्यावेळी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले, त्यावेळी अगदी ठरवून या बिल्डिंगमधील जागेची निवड केली. ज्या ठिकाणी आपल्या वडिलांचे सायकलचे दुकान होते, त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरु आहे याचे त्याला आज मोठे समाधान आहे. काळाचा महिमा फार मोठा असतो. ज्या ठिकाणी ऐपत नाही म्हणून चालू असलेले दुकान सोडून द्यावे लागले, त्याच ठिकाणी आज हे वैभव उभे राहिले. मात्र यामागे केवळ नशिबाचा नाही तर प्रचंड कष्टाचा वारसा आहे.
बारामतीतील टेक्निकल हायस्कुलमध्ये कसेतरी दहावीपर्यंत अतुलची गाडी गेली.. घरची परिस्थिती गरीबीची. वडिलांच्या सायकलच्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालायचे. स्वत:चे घर सोडले तर कोठेही एक जमिनीचा तुकडाही नाही. अशावेळी आपल्याला शिक्षणात गती नाही हे वेळीच लक्षात घेऊन आणि घरच्या आर्थिक स्थितीची जाणीव ठेवून त्याने नोकरी करण्याचे ठरवले.
बारामतीतील दिपक आर्टमध्ये त्याने १९९९ साली कामास सुरुवात केली. नुकताच फ्लेक्स प्रिटींगचा जमाना सुरु झाला होता. पण अजुनही अनेक ठिकाणी दुकानाच्या पाट्या पेंटर रंगवत होते. सुरुवातीच्या काळात अतुलनेही या पाट्या रंगवल्या. पण फ्लेक्स मशीन आली आणि पेंटरने रंगविलेल्या पाट्या दिसेनाशा झाल्या.
त्यावेळी फ्लेस प्रिटींगच्या व्यवसायातील सगळ्या खाचाखोचा अतुलने शिकून घेतल्या. अतुलच्या मुळच्या स्वभावातच एक गोडवा आहे. जिभेत साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे ही कोणत्याही व्यवसायाची पहिली अट असते. ते त्याच्याकडे मुळातच आहे. यासोबत वाटेल तेवढे कष्ट करण्याची तयारीही आहे. मग काय पाहिजे, १९९९ ते २०१३ या काळात केलेल्या उमेदवारीतून मिळालेले अनुभव गाठीस घेऊन २०१४ साली वेदांत ग्राफीक्स या स्वत:च्या स्वतंत्र व्यवसायाचा उदय झाला.
दुकानाचे बोर्ड, होर्डींग्ज, रस्त्यावरच्या पाट्या यातून प्रत्येक व्यावसाईक स्वत:ची जाहिरात करत असतो. पुर्वी हे काम पेंटींग करुन होत असे, त्यानंतर फ्लेक्स प्रिटींग सुरु झाले, आता तेदेखील मागे पडत चालले आहे. आता एलईडी लेटर्सचे बोर्ड, बॅकलाईट बोर्ड, एस.सी.पी. बोर्ड, निऑन लेटर्सचा जमाना आहे. काळाबरोबर होणारे हे बदल अतुलनेही स्विकारले आहेत. आज पुणे शहर सोडले तर आसपासच्या १०० किलोमीटरच्या परिसरातील सर्वात अत्याधुनिक मशिनरी वेदांत ग्राफिक्सकडे आहे.

कॅनव्हास प्रिटींग, लेझर कटींग, एलएडी लेटर्स तयार करण्याची मशीन, यासारख्या आधुनिक सर्व प्रकारच्या मशिनरी अतुलने घेतल्या आहेत. अगोदरच्या ठिकाणी काम करताना आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे समाधान होण्यासाठी जे मनापासून काम केले. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरु झाल्यावर त्या ग्राहकांचीही साथ मिळाली.
फ्लेक्स प्रिटींगबरोबरच एलईडी लेटर्सच्या व्यवसायातही मोठी प्रगती केली. आता बार्शी, अकलूज, कोल्हापूर, सांगली, विटा, मायणी, पुणे या सगळ्या परिसरातून लोक एलईडी लेटर्स बोर्डसाठी वेदांत ग्राफीक्समध्ये येतात. त्या त्या ठिकाणी जाऊन तिथे हे बोर्ड बसवून दिले जातात. एक काम केले की ते काम पाहून दुसरे ग्राहकही जोडले जातात. असे वेदांत ग्रााफिक्सचे वर्षानुवर्षे काम करून घेणारे लोक आज आहेत.
फ्लेक्स प्रिटींगने सुरु झालेला हा व्यवसाय साईज बोर्ड, एलईडी लेटर्स बोर्ड, साईनेजेस, कोनशिला, रेडियम वर्क्सपासून व्हिजिटींग कार्ड, लग्नपत्रिका तयार करण्यापर्यंत पोचला आहे. पण हा सगळा व्यवसाय म्हणजे वेळेशी शर्यत असते. कोणताही व्यवसायाची उभारणी पुरी झाली, की या व्यवसायाची जाहिरात करण्याचे पहिले साधन म्हणजे व्यवसायाच्या नावाचा बोर्ड उभारणे हा असतो.
हा बोर्ड जेवढा आकर्षक तेवढी त्या दुकानाची शोभा वाढते. बोर्ड तयार करायला येणाऱ्या माणसाच्या डोक्यात आपला बोर्ड आकर्षक झाला पाहिजे ऐवढेच असते. पण तो कसा आकर्षक होईल याबाबत बहुतेकांचे ज्ञान तोकडे असते. यापुढचे काम फ्लेक्स आणि ग्राफिक्समध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे असते. या माणसाची गरज आणि आर्थिक कुवत लक्षात घेऊन त्यातून योग्य आणि आकर्षक पर्याय पुढे ठेवण्याचे काम हे या व्यवसाय करणाऱ्या मालकाचे असते.
हे ज्याला चांगले जमते तो या व्यवसायात यशस्वी ठरतो. अतुलकडे आलेला प्रत्येक ग्राहक समाधानी असण्याचे हेदेखील एक उत्तम उदाहरण आहे. वेदांत ग्राफीक्समध्ये व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीचे सगळे पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यातून समोरच्या ग्राहकाला कोणता पर्याय उपयोगी ठरेल हे पाहून त्याला मार्गदर्शन करण्याचे कामही येथे होते.
यामध्ये जास्तीत जास्त पैसे कसे कमावता येतील हा उद्देश नसतो, तर समोरच्या माणसाचे काम कमीत कमी पैशात कसे होईल हा विचार असतो. त्यामुळेच वेदांत ग्राफिक्स ग्राहकांना आपले वाटते. आता फ्लेक्स प्रिटींगमध्ये खुप प्रकार आले आहेत. येथे एकदा काम करून घेण्यासाठी आलेला माणुस पुन्हा पुन्हा येत जातो. अतुल आणि त्याच्या सहकाऱ्यांची आलेल्या माणसासोबत वागण्याची बोलण्याची पद्धत ही प्रत्येकाला आदर देणारी आहे.
यासोबत वाजवी दर आणि वेळेत काम यामुळे हा माणुस वेदांत ग्राफीक्स सोडून कुठेही जात नाही. यामुळेच अवघ्या ८ वर्षात १५ हजाराहून जास्त समाधानी ग्राहकांचे पाठबळ वेदांत ग्राफीक्सला लाभलेले आहे. कामाचा व्याप आता इतका वाढला आहे की २००० स्क्वे. फूटचे वेगळे वर्कशॉप सुरु करावे लागले आहे.
कराडमधील टाटा शोरुमचा एलईडी बोर्डाचे अत्यंत तातडीचे काम अचानकपणे अतुलकडे आले. टाटा शोरुमच्या उद्घाटनाला अवघे चार दिवस बाकी होते, आणि त्यांना हा बोर्ड तयार करून हवा होता. खरे पाहता असा बोर्ड तयार करण्यासाठी किमान १५ दिवसाचा वेळ लागतो. परंतू ग्राहकाची अडचण ओळखून अतुलने हे आव्हान स्विकारले आणि तीन दिवसातच हा बोर्ड तयार करून जागेवर जावून लावून दिला. उद्घाटनाच्या दिवशी हा बोर्ड टाटा शोरुमच्या दरवाज्यावर मोठ्या दिमाखाने झळकत होता.
कोरोनाने सगळ्या जगाला मोठा फटका बसला, तसा वेदांत ग्राफीक्सलाही बसला. पण या अडचणीच्या काळात अतुलने सर्व कामगारांची काळजी घेतलीच , पण याबरोबरच जिथे जिथे फ्लेस किंवा बोर्डची गरज लागेल तिथे तो उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला साथ दिली. यामध्ये नगरपालिका, सरकारी दवाखाना, प्रायव्हेट हॉस्पीटल तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना जागेवर जावून फ्लेक्स बोर्ड उपलब्ध करुन दिले. खरे तर या काळात रस्त्यावर बाहेर पडायलाही माणसे भीत होती. पण तेथेही वेदांत ग्राफिक्सने अडचण ओळखून सेवा दिली.
बारामतीचे नाव साऱ्या देशभरात घेतले जाते. बारामतीच्या नेतृत्वाने येथे काम करणाऱ्या माणसाला संधी देणारे वातावरण उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दरदिवशी बारामती वाढते आहे. या वाढत्या बारामतीला सजविण्यासाठी ज्यांचे हात लागले आहेत, त्यातील एक नाव वेदांत ग्राफीक्स आहे. बारामतीच्या बाजारपेठेतील व्यापारी असो, हॉटेल असो, हॉस्पिटल्स, बिल्डर्स असो, शैक्षणिक संस्था असो, त्यांच्या प्रवेशव्दारावर त्यांच्या व्यवसायाचे जे नाव दिमाखाने झळकते आहे, त्यातील बरेचसे बोर्ड वेदांत ग्राफिक्समधून तयार झाले आहेत. ऐवढेच नव्हे रस्त्या रस्त्यावर दिसणारे वेगवेगळे फ्लेक्स, होर्डींग जर बारकाईने पाहिले तर त्याच्या एका बाजुच्या कोपऱ्यात अगदी लहान अक्षरात तुम्हाला वेदांत ग्राफिक्स असे लिहलेले आढळेल.
मात्र ज्यावेळी नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरवले, त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती. हातात काहीही नव्हते. व्यवसायासाठी गाळा भाड्याने घ्यायचा म्हणले तरी त्यासाठी डिपॉझिटची रक्कम कशी उभी करायची हा प्रश्न होता. यावेळेस समता नागरी पतसंस्थेने त्याच्यावर विश्वास दाखवला. घरच्या मंडळीही ठामपणे मागे उभी राहिली. त्यातून पाटस रोडवर वेदांत ग्राफिक्सच्या कामाला सुरुवात झाली.
कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठीची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली असते माणुसकी. समोरच्या प्रत्येक व्यक्तीला आदर देणे, त्याला काय पाहिजे ते समजून घेणे आणि त्याचे काम हे आपल्या घरचेच काम आहे असे समजून ते करून देणे यातून माणसे जोडली जातात, सोबत राहतात आणि त्यातून केवळ व्यवसायच नाही तर माणुस जिंकतो. एका शुन्यातून सुरु झालेला वेदांत ग्राफीक्सचा हा प्रवास आता करोडोंमध्ये पोचला आहे. परंतू आजही माणुस आणि माणुसकी अतुल आणि अविनाशने सोडलेली नाही. याच पायावर ते प्रगतीचे अनेक इमले बांधतील यात शंकाच नाही. अतुल बनकर यांना ९७६५९०५६५६ तर अविनाश बनकर यांना ९९२३२१२०३० या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता