शिरूर – महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दि.६ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून घोडगंगा साखर कारखान्याची ओळख आहे. घोडगंगा साखर कारखान्याची काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शासनाकडून निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
दरम्यान उच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. नुकतेच न्यायालयाने स्थगित निवडणूक पुन्हा जिथून थांबली होती तिथून घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दि. २५ ते २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येणार असून २८ ऑक्टोबर रोजी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि. ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.