बारामती – महान्यूज लाईव्ह
अडचणीतील लोक गाठून त्यांना अगोदर बॅंकेचे कर्ज देतो असे सांगायचे, मग कर्ज मिळत नाही, म्हणून ओळखीच्या लोकांकडून थोडे दिवस व्याजाने पैसे घेऊ असे सांगायचे आणि त्या सावकारकीच्या कर्जात कर्जदाराला उध्वस्त करायचे काम करणाऱ्या चौघांना तालुका पोलिसांनी धडा शिकवला आहे,. विशेष म्हणजे यातील एक माजी सरपंच, माजी उपसरपंच, एकजण इंदापूर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्याचा पती आहे.
बारामती तालुका पोलिसांनी यासंदर्भात एमआयडीसी तांबेनगर परिसरातील भारती संभाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून अहमदनगर जिल्ह्यातील एरंडोली येथील भिमाजी भिकाजी भंडारे, शिर्सूफळचा माजी सरपंच अतुल हिवरकर, माजी उपसरपंच विश्वास आटोळे, लासुर्णे (ता. इंदापूर) येथील संजय निंबाळकर व कसबा येथील ऋतुजा ढवाण या पाच जणांवर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २४ जानेवारी २०२०२ ते १७ ऑक्टोबहर २०२२ या कालावधीत घडली असून भादवि कलम 506, 34 महाराष्ट सावरकारीचे अधिनियम 2014 चे कलम 39,45 नुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी यांचे पतीचे निधन आजारपणाने झाले. या काळात त्यांच्या उपचारासाठी नातेवाईकांकडून घेतलेल्या हातउसने पैशासाठी त्यांना त्यांच्या मालकीच्या रो-हाऊसवर कर्ज हवे होते. त्यासाठी फिर्यादी यांच्या मुलाने लासुर्णे येथील ओळखीटा गणेश थोरात याच्यामार्फत कर्जाची विचारणा केली, तेव्हा संजय निंबाळकर व शिर्सूफळ येथील अतुल हिवरकर हे दोघे कर्ज मिळवून देत असल्याची माहिती मिळाल्याने दोघांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
थोरात याने या दोघांना तांबेनगर येथील जाधव यांच्या घरी आणले. तेव्हा या दोघांनी जाधव यांच्याकडून रो हाऊसची कागदपत्रे घेतली व संभाजीनगर येथील शुभम फायनान्सकडे दिली. त्यानंतर काही दिवसांनी संजय निंबाळकर याने २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे, मात्र तेथील मॅनेजरला ५ लाख कमिशन द्यावे लागेल असे सांगितले. तेव्हा तेथील मॅनेजरला विचारणा केल्यानंतर मॅनेजरने आम्ही कोणतेही कमिशन घेत नाही, मात्र तुमचे कर्ज कॅन्सल झाले असल्याची माहिती दिली.
यानंतर संजय निंबाळकर व अतुल हिवरकर यांनी दुसऱ्या एखाद्या बॅंकेत फाईल देऊन बघू असे सांगितले व दोन-तीन महिने झाल्यानंतर कर्ज मंजूर होत नसल्याने जेव्हा जाधव यांनी फाईल मागितली. तेव्हा अतिशय गरज असेल, तर ओळखीच्या विश्वास आटोळे याच्याकडून १५ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
काही दिवसांतच विश्वास आटोळे याला घरी आणून तेथे रो-हाऊसची कागदपत्रे दिली. तेव्हा तारण म्हणून रो-हाऊसची नोटरी करून द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर सुयश सहकारी गृहरचना संस्थेतील मिळकतीतील रो-हाऊस लिहून घेतला. अगोदर फक्त नोटरी म्हणून सांगितलेल्या या रो हाऊसचे थेट खरेदीखत या सर्वांनी करून घेतले. दस्त वाचण्यास न देता घाईगडबडीत स्वाक्षरी घेतली.
त्यानंतर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम म्हणून ३ लाख रुपये वैशाली संजय निंबाळकर यांच्या बॅंक खात्यात भरा असे विश्वास आटोळे यांनी सांगितले. मात्र त्यानंतर ऋतुजा ढवाण, संजय निंबाळकर व अतुल हिवरकर हे काही दिवसांनी रो – हाऊसचा ताबा मागण्यास आले, तेव्हा हे रो- हाऊस या सर्वांनी गहाण म्हणून न घेता थेट खरेदी म्हणून घेतले असून अहमदनगर जिल्ह्यातील भिमराव भिकाजी भंडारे याच्या नावावर केल्याचे जाधव यांच्या लक्षात आले.
त्यावरून त्यांनी तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक विधाते पुढील तपास करीत आहेत.