फलटण – महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वी सोमंथळीच्या ओढ्याच्या पुरात इर्टिगा गाडी बुडाली आणि त्यात १३ वर्षीच्या लेकीसह जवानाचा अंत झाला. जम्मू काश्मिरमध्ये तैनात असलेल्या छगन मदने व त्यांची १३ वर्षांची कन्या प्रांजली या दोघांच्या मृत्यूने फलटण व माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
छगन मदने हे त्यांचे सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी सोमंथळीकडे निघाले होते. मात्र थोडा उशीर झाल्याने अंधार पसरला होता आणि इकडे सोमंथळी – सस्तेवाडी रस्त्यावरील ओढ्याला दुपारच्या मुसळधार पावसाने भरपूर पाणी आले होते. पाण्याचा वेगही अधिक होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने छगन मदने यांनी पाण्यात घातलेली इर्टीगा गाडी बुडाली. जम्मू काश्मिरमध्ये लष्करी सेवेत असलेल्या छगन यांना काही दिवस सुट्टी असल्याने सुट्टीनिमित्ताने ते वारुगड (ता. माण) येथे आले होते. सासऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या छगन मदने यांची ती भेट अखेरची भेट ठरली.