पाटणा – महान्यूज लाईव्ह
देशात आधीच एका नीरज मोदीने मोठा धुमाकूळ घातला असताना आता दुसऱ्या एका बिहारी नीरज मोदीचा फंडा पाहून पोलिसही चक्रावले आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिस आपल्याला पकडतील म्हणून त्याने आपल्या मृत्यूचाच बनाव केला. तो मेला हे कोर्टातही सिध्ददेखील झाले.. पण पिडीत अन्यायग्रस्त मात्र गप्प बसला नाही, त्याने पाठपुरावा केला आणि पोलिसांनाही नीरजला पकडावेच लागले..अखेर पोलिसांनी हा जिवंत मुडदा कोर्टापुढे सादर केला..!
भागलपूर कोर्टातील ही घटना देशात खळबळ माजवणारी ठरली आहे. नीरज मोदी या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. मात्र त्याचा या दरम्यान मृत्यू झाला. कहलगाव गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार त्याच्या वडीलांनी केले. त्याचे मृत्यूचे प्रमाणपत्र कोर्टात दाखवल्यानंतर कोर्टाने आरोपी मयत झाला म्हणून केसच बंद केली.
या घटनेला काही दिवस उलटले. मात्र ज्या मुलीवर अत्याचार झाला होता, तिची आई मात्र या घटनेत काळेबेरे असल्याचे मानत राहीली. मग ती या सरकारी व्यवस्थेविरोधात लढत राहीली. तिने संघर्ष सुरू केला.
सुरवात तिने मृत्यूपत्रापासून केली. मग पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर हे मृत्यू प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिध्द झाले. मग पोलिस नीरजच्या वडीलांपर्यंत राजाराम मोदीपर्यंत पोचले.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या कटात वडीलच सहभागी होता हे पोलिसांच्या लक्षात आले. राजाराम मोदी याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सिध्द करताना चितेवर झोपवून त्याचे फोटो काढले. स्मशानात चितेसाठी वापरलेल्या लाकडांचे बिल तयार करून मुलाचे मृत्यूचे प्रमाणपत्र तयार करून घेतले होते.
हे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी राजाराम मोदीला अटक केली. मग मात्र नीरज मोदीला आता सुटायला काहीच मार्ग नसल्याचे दिसल्याने त्याने स्वतःहून भागलपूर कोर्टापुढे आत्मसमर्पण केले.