इंदापूर- महान्यूज लाईव्ह
कळस येथील जयहिंद फिडस या कंपनीचे पशुखाद्य घेऊन २८ लाखांची फसवणूक केली. धनादेश वठले नाहीत व रक्कम न देता कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यावरून वालचंदनगर पोलिसांनी दोन चुलतभावांवर गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली आहे.
सुरली टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील मच्छिंद्र आजिनाथ कदम (वय ३० वर्षे, धंदा दुध डेअरी) व देविदास कुबेर कदम ( वय ३२ वर्षे, धंदा- शेती रा. सुरली टेंभूर्णी) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
यासंदर्भात जयहिंद कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी विनोद पांडूरंग गायकवाड यांनी फिर्याद दिली होती. यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एरिया सेल्स मॅनेजर म्हणून कंपनीने मच्छिंद्र अजिनाथ कदम यास कामावर घेतले होते. कदम याला कंपनीने कोणत्याही नातेवाईकामार्फत कोणतेही व्यवहार करता येणार नाही अशी अट घातली होती. मात्र कदम हा कंपनीकडून पशुखाद्याचा माल घेऊन विक्रेत्यांना पुरवत होता. हे करताना तो विक्रेत्यांकडून अगाऊ रक्कम घेऊन कंपनीकडे मात्र विक्रेत्याने उधारीवर माल घेतलेला आहे असे सांगत होता.
दरम्यान तो अगाऊ रक्कम घेऊन क्रेडीटच्या काळात हे पैसे तो स्वतः वापरतो आणि क्रेडीट मुदत संपण्याच्या वेळी कंपनीत भरत असल्याचे कंपनीच्या नजरेस आले. त्यातच मच्छिंद्र कदम याने त्याचा सख्खा चुलतभाऊ देविदास कदम याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय करून पशुखाद्याची विक्री केली. १३ ऑगस्ट २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ या काळात त्याने २ कोटी ८८ लाख रुपयांचा माल खरेदी केला व २ कोटी ६० लाख रुपये जयहिंद कंपनीकडे भरले असल्याचे निदर्शनास आले.
उर्वरित २७ लाख ९७ हजार रुपयांची मागणी केली असता या रकमेची त्याने टाळाटाळ केली व बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेचा दिलेला धनादेश न वटता परत आल्याने त्याने कंपनीचा विश्वासघात केल्याचे दिसून आले. यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने दमदाटी केली.
त्यामुळे पशुखाद्याच्या बिलापोटी राहीलेली २८ लाखांची रक्कम देण्याबाबत त्याने कंपनीची आर्थिक फसवणूक केल्यावरून मच्छिंद्र कदम व देविदास कदम या दोघांविरोधात गायकवाड यांनी फिर्याद दिली. वालचंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून २० ऑक्टोबर पर्यंत त्या दोघांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत.