कासवाची शिकार केल्याप्रकरणी वरवंड येथील बाप – लेकाला अटक! दौंड वन विभागाची कारवाई!
दौंड: महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथे कासवाला पकडून त्याला कापून खाण्यासाठी शिकार केल्याप्रकरणी दौंड वन विभागाने दोघांना अटक केली आहे. अशी माहिती दौंड वनविभागाने दिली. नाना धर्माजी सावंत व दादा नाना सावंत ( रा.वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत दौंड वन विभागाने दिलेली माहिती अशी की, सोशल मीडियावर कासव पकडून त्याला मारुन कापून खाल्ले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ तालुक्यातील वरवंड येथील असल्याची माहिती मिळाल्याने दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी वनपाल व वनरक्षक यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार मंगळवारी (दिनांक १८) वरवंड वनपाल शितल खेंडके व वनरक्षक शितल मेरगळ यांनी माहिती मिळालेल्या घटनास्थळी त्वरित धाव घेतली. या वन अधिकाऱ्यांनी वरवंड परिसरातील कानिफनाथ नगर येथील सावंत यांच्या घराजवळ नाना सावंत कासव या प्राण्याची तुकडे करून एका घमेल्यामध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले.
तर काही अंतरावर घराच्या भिंतीशेजारी कासवाचे कवच असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी या दोघांना ताब्यात घेऊन कासव हा वन्यप्राणी असल्याने आणि कासव या प्राण्याची त्याला पकडून आणून त्याचे मांसाचे तुकडे करून भाजून खाण्याकरता शिकार केल्याप्रकरणी या दोघांवर भारतीय वन्यजीव अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाने या दोघांना ताब्यात घेतले असून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहुल पाटील, पुणे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.