बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे शहर आणि जिल्ह्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागाला आज ( बुधवारी ) ही पाऊस दणका देण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे . दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसातून लोक अजून सावरलेले नसताना या पावसाचा अंदाज धडकी भरविणारा आहे.
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किमी अंतरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी ( दि. १८ ) रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतीवृ्ष्टी झाली. तसेच कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला. आज ( बुधवार दि. १९ ) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
या अंदाजानूसार कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात विजांसह पाऊसाची शक्यता आहे. मात्र गुरुवार ( दि. २० ) पर्यंत छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडीशाच्या काही भागातून मान्सून परतण्यासाठी पोषक स्थिती असल्याची माहितीही हवामान खात्याने दिली आहे.