बारामती – महान्यूज लाईव्ह
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने स्वतःच्या व बारामतीच्या नवलाईत भर घालताना देशातील सर्वात अधुनिक, १७ फिल्टरेशनची सुविधा असलेले बंदिस्त व ऑलिंपीक दर्जाचे जलतरण केंद्र उभारले आहे. २१ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या माध्यमातून या तलावाची सुरवात होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जलतरणपटू वीरधवल खाडे, सुयश जाधव यांच्या उपस्थितीत या जलतरण तलावाची सुरवात होणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.
पत्रकार परीषदेत ही माहिती पवार यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शारदानगरमधील कृषी महाविद्यालयाशेजारी हे जलतरण केंद्र सुरू करण्यात आले असून हे केंद्र उभारताना अधुनिक तंत्राची साथ यामध्ये घेण्यात आली आहे. ५० मीटर लांबीचे हे केंद्र पू्र्ण बंदिस्त आहे. अत्याधुनिक स्टिम सुविधा, १७ अधुनिक व उच्च दर्जाचे फिल्टर्स या केंद्रात आहेत.
२१ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता या तलावाचे उदघाटन होणार आहे, या निमित्ताने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी राज्यभरातील ५०० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला आहे.