बारामती – महान्यूज लाईव्ह
राज्यात यंदाही १४ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्र उसाच्या तोडणीचे शिल्लक असताना अगोदर १ ऑक्टोबरपासून सुरू करावयाचा गळीत हंगाम यंदा पंधरा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रीसमितीने घेतला आणि १५ ऑक्टोबरचा मुहूर्त परतीच्या पावसाने हुकवला.. राज्यातील सर्वच कारखान्यांच्या संकल्पावर पावसाने पाणी फिरवले नाही, तर चक्क ओतले.. आता हा हंगाम आणखी चार -पाच दिवस किंवा अगदीच परतीच्या पावसाने अजून मुक्काम ठोकला, तर एक-दीड आठवडे पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील गळीत हंगाम १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोणी सुरू केला, तर त्यांच्या एमडी विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करू अशी धमकी देणाऱ्या साखर आयुक्तांना आता राज्यातील लांबणाऱ्या गळीत हंगामाच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. मात्र हे आयुक्त त्यावेळी असणार नाहीत, त्यामुळेच या साखर आयुक्तांना त्याचे काही देणेघेणे नसेल, तर त्यात नवल वाटायचे कारण नाही आणि जेव्हा गळीत हंगाम लांबेल, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल, तेव्हा मात्र त्यावेळच्या नवीन साखर आयुक्तांना आपण स्वतः हा निर्णय घेतला नव्हता, त्यामुळे ऊस शिल्लक राहून नुकसान झाले, तर त्याचेही फारसे सोयरसुतक राहणार नाही.
१५ ऑक्टोबरपासून परवानगी दिल्याने १३ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाची तयारी करणाऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात परतीच्या पावसाने राडा घातला. त्यामुळे अनेक ठिकाणी तोडलेला ऊस शेतातच आणि जुंपलेले ट्रॅक्टर बांधावरच अडकून पडण्याची वेळ आली आहे.
ज्या कारखान्या्ंनी पुरेशी तोडणी यंत्रणा आणली, त्यांनाही आता मजूरांना घरी बसून खर्च देण्याची वेळ आली आहे. एकंदरीतच नमनालाच साखर कारखान्यांना चांगलाच धडा बसला आहे. मात्र याचा फटका आता साखर कारखान्यांना दिसत असला तरी शेवटच्या महिन्यात ऊस उत्पादकांना जी धावाधाव करावी लागणार आहे, ती यंदा न भूतो अशी असेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.