बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्याच्या दोन्ही सीमेवरुन वाहणाऱ्या नीरा आणि कऱ्हा नद्यांनी आज रौद्र स्वरुप धारण केले आहे. काल बारामतीसह पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्या पावसाचे पाणी काल रात्रीपासूनच पुरंदर तालुक्यातून बारामतीच्या दिशेने वाहू लागले. त्यामुळे पावसाळा संपण्याचे दिवस आले असताना नीरा आणि कऱ्हेला मोठा पूर आल्याचे पहायला मिळाले.
नाझरे धरणातून ३५००० क्युसेसने पाणी कऱ्हा नदीत सोडण्यास काल रात्री सुरवात झाली. त्यामुळे दिवस उजाडता उजाडता बारामती शहरातील कऱ्हेचे पात्र तुडुंब भरून वाहू लागले. या पुराने शहरातील पंचशीलनगर भागातील घरांमध्ये पाणी शिरले.
नीरा नदीचेही पात्र दुथडी भरून वाहू लागले. नदीवरचे बहुतेक सगळे बंधारे पाण्याखाली गेले. होळचा पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. कोऱ्हाळे खुर्दच्या बंधाऱ्यावरून पाणी जाऊ लागले. तेथील स्मशानभूमीतही पाणी शिरले.
या पावसाळ्यात नीरा येथील बुवासाहेब ओढ्याला यापुर्वी दोनदा पुर येऊन नीरा बारामती रस्त्यावर पाणी पाणी आले होते. कालच्या पावसाने हा पुल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला.
वडगाव निंबाळकर येथे एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्यक्तीचा शोध सध्या चालू आहे. काऱ्हाटी येथेही नदीच्या पाण्याच्या चारचाकी वाहून गेली आहे.
पावसाच्या या तडाख्याने शेतीचे अतोनात नुकसान केलेले आहे. या नुकसानीची पाहणी तातडीने सुरु करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.