बारामती : महान्यूज लाईव्ह
परतीच्या पावसाने रात्रभर जो धिंगाणा घातला आहे, त्यातून नाझरे धरणातून आज पहाटे साडेपाच वाजता 35 हजार क्यूसेक्स पाणी सोडावे लागले. बारामती त पाण्याचा विसर्ग वाढू लागला असून बारामती शहरातून कऱ्हा नदी वाहत असल्याने जलसंपदा विभागाने सावधानतेची सूचना दिली आहे.
नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणात येणार्या पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्हा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे.
सध्या ३५२५० क्युसेक्स वेगाने कर्हा नदीत विसर्ग चालू आहे. त्यामुळे कऱ्हा उचंबळून वाहत असून करा नदीच्या पाण्यात वेग आहे. त्यामुळे कर्हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
सन 2019 मध्ये ढगफुटीनंतर नाझरे धरणातून रात्रीच्या वेळी मोठा निसर्ग सोडावा लागला होता आणि त्यातून बारामती शहरात प्रचंड महापूर आला होता. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग काळजी घेत आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.