राजेंद्र झेंडे
दौंड, महान्युज लाईव्ह
सध्या या देशात आणि राज्यात ज्या पद्धतीने राजकीय सत्तांतर व बदल घडत आहेत. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते राज्याला आणि देशाला अस्थिरता निर्माण करणारे आहे.हे लोकशाहीच्या मूलभूत तत्व आणि अस्मितेला घातक असे असुन चिंताजनक आहे, अशी खंत राजमाता अहिल्यादेवी होळकर घराण्याचे थेट वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी व्यक्त केली.
दौंड तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने तालुक्यातील पाटस येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात रविवारी ( दि.१६ ) विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान व गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भुषणसिंह राजे हे बोलत होते. ते म्हणाले की, मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले, संताजी – धनाजी सारखी विश्वासू मावळ्यांमुळेच हे शक्य झाले. महाराणी अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर , महादजी शिंदे यांनी मराठा तख्त अटकेपार पोचवले. ज्या महापुरुषांनी जाती विरहित बहुजन समाजासाठी काम केले त्याच महापुरुषांना आज जाती जातीत विभागले गेले अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. मात्र सध्या युवा पिढीने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज असुन त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याची आवश्यकता आहे.
मात्र सध्या देशात आणि राज्यात राजकीय अस्थिरता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. या देशात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आणि ती जिवंत ठेवण्याचे काम आजच्या युवकांनी केले पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले. तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे पाटील म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही फक्त तोडफोड करणारी संघटना नाही तर तर ती फुले शाहू आंबेडकर व सर्व बहुजन महापुरुषांच्या विचाराने चालणारी संघटना आहे. इतिहासातून होणारी बहुजन संत व महापुरुषांचे बदनामी रोखण्यासाठी व त्यांच्या अस्मितेसाठीच आम्हाला तोडफोड आंदोलन करावे लागले. मात्र मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने युवकांच्या हातात दगड ऐवजी पुस्तक दिले , एक वैचारिक चळवळ उभी केली.या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय संघटन उभे राहिले. संभाजी ब्रिगेडने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आगामी काळात राज्यात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे सरकार स्थापन होईल. असा विश्वास आखरे पाटील यांनी बोलून दाखवला. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश पासलकर म्हणाले की, दौंड संभाजी ब्रिगेडचे काम अतिशय चांगले आहे. त्यांच्याकडे युवा संघटन मजबूत असुन सामाजिक काम चांगले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना पूर्णपणे राजकीय ताकत उभी करून सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी दिले. तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर यांनी दौंड संभाजी ब्रिगेडच्या कामकाजाचा लेखाजोखा आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातुन मांडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार दौंड संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कुलदीप गाढवे- देशमुख यांनी मानले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, राज्य सहसंघटक मनोज गायकवाड, दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ आदींसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे…
विशेष सन्मान :- महिला बचत गटाच्या कमलाताई परदेशी, गरुड झेप चे दिग्विजय जिधे,खुटबाव येथील बालकाश्रमचे खंडेराव खाडे, बोरमलनाथ गोशाळेचे कैलास शेलार,
यशस्वी उद्योजक:- हनुमंत जांबले, लक्ष्मण कदम, संतोष दोरगे, तानाजी केकाण,
विशेष सामाजिक पुरस्कार:- स्वप्निल शहा, हरिचंद्र भोईटे, अनिल ताडगे, मनीराम चौधरी. विशेष प्रवीण पुरस्कार :- केतन भापकर व रितेश इथापे.
उत्कृष्ट पत्रकारिता :- महाराष्ट्र टाइम्सचे नरेंद्र जगताप, पुण्यनगरीचे सचिन आव्हाड, पुढारीचे संदीप सोनवणे, न्यूज १८ चे सुमित सोनवणे, महान्यूज व दैनिक नवराष्ट्रचे राजेंद्र झेंडे, पुढारीचे राजेंद्र खोमणे, लोकमतचे आप्पासाहेब मेगावडे, सकाळचे संतोष काळे,
आदर्श शिक्षक:- मोहम्मदशफिक म. मणियार, सागर गावडे,
कृषी विभाग:- माऊली कापसे व समीर डोंबे.
उत्कृष्ट व्याख्याते:- निलेश जगताप.
कला क्षेत्र :- कलाशिक्षक विठ्ठल सोडनवर व चित्रपट रोल नंबर १८ चे अभिनेता सुभाष यादव.
क्रीडा क्षेत्र :- महाराष्ट्र केसरी कुस्ती राष्ट्रीय पंच रवी बोत्रे. सांस्कृतिक संवर्धन क्षेत्र:- भटकंती इतिहास अभ्यासक श्रीकांत हंडाळ, समाजप्रबोधनकार सुनंदाताई भोस,.
आरोग्य दूत:- केडगाव येथील वरदविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन भांडवलकर, राहू आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन पांढरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सादिया खान.
कोविड योद्धा पुरस्कार:– मयूर सोळसकर, हर्षल भटेवरा, रविदास ताकवणे.
वृक्ष संवर्धन :- आईचे बन प्रशांत मुथा, वनश्री मनोज फडतरे,
शैक्षणिक क्षेत्र :- ऐश्वर्या पासलकर. आदींना आपापल्या क्षेत्रात अतिशय चांगले व उत्कृष्ट काम केल्याबद्दल एक पोत्साहन म्हणून सन्मानचिन्ह व गुणगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.