मुंबई – महान्यूज लाईव्ह
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीतील रंगत वाढली असून मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली, त्यानंतर आज पहाटेपासून भाजपची बैठक सुरू झाली आहे.
मेघदूत बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार व मुरजी पटेल यांच्यात आज सकाळपासून बैठक सुरू आहे. यामध्ये भाजपची रणनिती ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीवरून मोठी चर्चा सुरू असून सर्व पक्ष एकीकडे व भाजप एकीकडे अशी स्थिती आहे.
एकूणच राज्यातील वातावरण या निवडणूकीवरून चांगलेच तापले असून शिवसेनेला दिलेल्या वागणूकीवरून मुंबईतील राजकीय परिस्थितीही तणावाची आहे, याचा मोठा फटका भाजप व शिंदे गटाला बसू शकतो याची जाणीव सरकारमधील धुरीणांनाही आहे आणि अंधेरी पूर्व विधानसभा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकली, तर महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे निवडणूक होण्यापेक्षा ती बिनविरोध होण्याने शिंदे गटाचीही मूठ सव्वालाखाची राहील आणि भाजपचीही..
आज पहाटे भाजपची बैठक सुरू झाली. या बैठकीतील रणनितीची माहिती केंद्रीय नेतृत्वाला दिली जाईल आणि त्यानंतर भाजप योग्य तो निर्णय घेईल असे सांगितले जात आहे. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर या नाट्याला सुरवात झाली. तोपर्यंतच्या आजवरच्या काळात कधीही यावर चर्चा झाली नव्हती. मात्र काल अचानक ठाकरे यांच्या पत्रानंतर चर्चा सुरू झाली, त्यात शरद पवार यांच्या पत्रकार परीषदेने भर घातली आणि त्यात कळस केला तो सरनाईक यांच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या पत्राने..!