राजेंद्र झेंडे
दौंड: महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील टेळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काही अनोळखी चार-पाच व्यक्ती कार्यालयातच स्वयंपाक करणे, अंघोळ करणे व मुक्काम करीत असल्याचा हा प्रकार उघड झाला आहे. ही ग्रामपंचायत कार्यालय आहे की धर्मशाळा ? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत असून तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. मागील चार-पाच दिवसापासून टेळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कुठून तरी अनोळखी चार व्यक्ती मुक्काम करत आहेत. हे व्यक्ती सरकारी कर्मचारी नाहीत. ते कोठून आलेत, ते काय काम करतात याचा थांगपत्ता नाही, असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाने या अनोळखी व्यक्तींना ग्रामपंचायत कार्यालयच राहण्यासाठी ,जेवणासाठी आंघोळीसाठी व वापरण्यासाठी त्यांच्या ताब्यात दिले आहे.
मुळात ग्रामपंचायत कार्यालय हे शासकीय कार्यालय असून या ठिकाणी शासकीय कागदपत्रे व इतर आवश्यक महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यंत बेजबाबदारपणे अनोळखी व्यक्तींच्या ताब्यात ग्रामपंचायतीचे कार्यालय दिल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत कार्यातील महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे गहाळ झाल्यास किंव्हा इतर काही ग्रामपंचायतीचे नुकसान झाल्यास , चोरी झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत असून या प्रकाराची दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी सखोल चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ संतोष टेळे यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत ग्रामसेवकास शेलार यांना विचारले असता ते म्हणाले की मी दोन-तीन दिवस झाले ग्रामपंचायत कार्यालयाकडे गेलो नाही. मात्र धार्मिक कामाच्या निमित्ताने काही लोक आले असून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात राहण्याची व्यवस्था केल्याचे समजले आहे, याबाबत सविस्तर माहिती घेतो असे त्यांनी सांगितले