बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथील ओढ्याला आलेल्या पाण्यातून वाट काढू पाहणाऱ्या नरेश म्हस्कू साळवे यांचा मृतदेह तब्बल चार दिवसानंतर आज सापडला.
गुरूवारी (ता. १३) रोजी ही घटना घडली होती. गावातील माळीवस्तीकडून बाजारतळाकडे येत असताना पुलावरून पाणी वाहत असतानाही साळवे यांनी त्यातून रस्ता पार करण्याचे धाडस केले. मात्र तीन-तीन निरा डाव्या कालवे भरून वाहतील एवढा पाण्याचा वेग व पाणी असल्याने त्या वेगात साळवे हे पाण्याच्या प्रवाहात घसरून वाहून गेले.
गेल्या दोन ते तीन दिवस त्यांचे शोधकार्य सुरू होते. अखेर आज सकाळी साळवे यांचा शोध लागला. पूलापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर अंतरावर साळवे यांचा मृतदेह सापडला. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रवादी आपत्ती व्यवस्थापन सेलच्या जवानांनी त्यांचा शोध घेण्यास आज सकाळी सुरवात केली होती.
राष्ट्रवादी आपत्ती व्यवस्थापन समितीचे संतोष शेलार, करिम सय्यद दिलीप गायकवाड, मनोज साळवे, सागर जबरे, संदीप गव्हाणे यांच्या पथकाने हे शोधकार्य पूर्ण केले. दरम्यान बारामतीचे प्रा्ंताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळखर यांच्यासह परिसरातील पदाधिकाऱ्यांनी येथे भेट दिली होती.