मुंबई – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसा्ंपासून सुरू असलेल्या घटना व मध्यंतरी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर आपली बदनामी झाल्याचे सांगत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करत विष घेतले.
मराठा क्रांती मोर्चाचे चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्तक माझी बदनामी करीत असून त्यांना सोडू नका, मी कोणतेही पाप केले नाही. माझ्या पत्नी व मुलांना सांभाळा असे म्हणत त्यांनी विष घेतले.
रमेश केरे यांना सध्या सोशल मिडीयातून मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जोरदार टिका केली आहे. आजही दिवसभर केरे हे खोटे बोलतात, आजवर खोटे बोलून व समाजाची दिशाभूल करून त्यांनी नेमकी किती संपत्ती गोळा केली याची चौकशी करावी अशी मागणी मराठा समाजातील नेटकरी करीत होते. त्याच पार्श्वभमीवर अचानक केरे यांनी विषारी औषध प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे.
आज दुपारी केरे यांनी फेसबुक लाईव्ह करीत आपली भूमिका मांडली आणि अचानक त्यांनी निळ्या बाटलीतील द्रव्य पिण्यास सुरवात केली. हे द्रव्य पीत पीतच त्यांनी आपली भूमिका मांडली.
दोषींना शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. जे जे लोक यामध्ये दोषी आहेत, ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली, क्लिप व्हायरल केली, त्यांची चौकशी सीबीआय, सीआयडीमार्फत केली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, मी आयुष्यभर समाजासाठी चुकीचे काम केले नाही. माझ्यावर समाजमाध्यमावर कशाप्रकारे आरोप सुरू आहेत याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे असे म्हणत म्हणत ते हे द्रव्य पित होते. या दरम्यान त्यांनी योगेश केदार, शेलार अशी नावे घेत ज्या ज्या लोकांनी मानसिक त्रास दिलेला आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी केली.
मी काहीही पाप केलेले नाही. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व जे दोषी असतील, जे मुख्यमंत्री महोदय माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून घ्या.. व ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा असे म्हणत त्यांनी निळ्या रंगाच्या बाटलीतील द्रव्य प्राशन केले. दरम्यान रमेश केरे यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीस धोका असल्याचे सांगितले जात आहे.