मुंबई – महान्यूज लाईव्ह
अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवार देऊ नये असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केल्यानंतर आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीत दोन पक्षांनी केलेल्या मागणीनंतर ही निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार काय याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
आज संध्याकाळी पत्रकार परीषदेत पवार यांनी वरील आवाहन केले. ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र राज्यात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्हीही उमेदवार दिला नव्हता. विशेष म्हणजे आता सार्वत्रिक निवडणूकीसाठी फक्त दीड वर्षाचा कालावधी आहे, तर मुंडे यांचे निधन झाले, तेव्हा निवडणूकीला पावणेपाच वर्षांचा कालावधी होता.
रमेश लटके यांचे विधीमंडळातील योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील. त्याचा योग्य तो संदेशही महाराष्ट्रात जाईल. राज्यात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना अविरोध निवडून द्यावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.
दरम्यान सध्या मुंबईतील हालचाली वेगवान झाल्या असून दोन पक्षांच्या प्रमुखांनी अचानक पत्रकार परीषदा घेऊन आवाहन करण्याचा अर्थही राजकीय वर्तुळात वेगवेगळा काढला जाऊ लागला असून राज्यातील सध्याचे सहानुभूतीचे वातावरण, त्याचा राजकीय फटका एकीकडे आणि दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणातील वाढलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करणे हा एक पर्याय राहू शकतो असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
एकंदरीत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक बिनविरोध होण्याची अथवा भाजपचा उमेदवार या निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचीच चिन्हे अधिक आहेत. आता निवडणूक झाल्यास भाजप व शिंदे गटावर नाराजीचे खापर फुटू शकते. भावनिक राजकारण करीत नाही असे म्हणणारा भाजपही या दोन नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेऊ शकतो असे बोलले जात असून कदाचित माघारीच्या दृष्टीनेही ही व्यूहरचना असू शकते अशी चर्चा मुंबईत सध्या सुरू आहे.