औरंगाबाद : महान्यूज लाईव्ह
औरंगाबादच्या सरकारी दवाखान्यात एका अतीव्हिआयपीच्या दातावर उपचार सुरु होते आणि अचानक वीज गेली. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या डोळ्यासमोरच चांदण्या चमकल्या. या रुग्णालयात जनरेटरची व्यवस्थाही नव्हती. अखेर मोबाईलच्या लाईटच्या प्रकाशात या अतीव्हिआयपीचे रुटकॅनॉल पार पडले.
हे व्हिआयपी होते औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे. नवीन सरकार स्थापन होते वेळेपासून हे मंत्री महोदय वेगवेगळ्या कारणानी चर्चेत राहिले आहेत. औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून ते शासकीय कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेत होते. याच कारणाने त्यांनी औरंगाबादच्या शासकीय दंत रुग्णालयालासुद्धा भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या दाताच्या समस्येबाबत उपस्थित डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णालयातच उपचार करू असे सांगितले आणि मंत्रीमहोदयांनीही त्याला मान्यता दिली.
मंत्रीमहोदय स्वत: सरकारी रुग्णालयात उपचार घेणार म्हणल्यावर सगळे रुग्णालयाचे प्रशासन अलर्ट झाले. जिल्हा अधिष्ठात्यासह सर्व डॉक्टरही उपस्थित राहिले. मात्र प्रत्यक्ष उपचार सुरु असतानाच लाईट गेली. रुग्णालयात जनरेटरची किंवा बॅटरी बॅकअपचीही व्यवस्था नव्हती. रुग्णालयाचे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर उपस्थित सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरु केले आणि त्या प्रकाशात मंत्रीमहोदयांच्या दातावर रुटकॅनॉलचा उपचार पार पडला. या सगळ्या प्रकाराने मंत्री भुमरे चांगलेच नाराज झाले.
या प्रकारानंतर भुमरेंनी तातडीने जनरेटरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यावेळी विचारणा केली असता गेल्या पाच वर्षापासून जनरेटरची मागणी प्रलंबित असल्याची माहितीही त्यांना मिळाली. मात्र आता तातडीने जनरेटर घ्यावा आणि नवा जनरेटर येईपर्यंत कोविड केअर सेंटरमधील जनरेटर आणण्याचेही आदेश भुमरे यांनी दिले.
मात्र या निमित्ताने सरकारी रुग्णालयाची खरी परिस्थिती मंत्रीमहोदयांच्या समोर आली हेही काही कमी नाही.