मुंबई महान्यूज लाईव्ह
राज्यात ऋतुजा लटके प्रकरण सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारने एवढे लटकवले की, आता राज्याच्या अगदी वाड्यावस्त्यांवर देखील सर्वांना ऋतुजा लटके माहिती झाल्या आहेत.. ही राष्ट्रीय समस्या असल्यापर्यंतची सगळी खबरबात झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, भाजप नेत्यांनी आम्ही वैचारिक लढा देतो, सहानुभूतीचा नाही असे म्हटल्यानंतर आज अचानक मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने पत्र लिहून एक लेटरबॉम्ब सोडला आहे.. ज्यामध्ये देवेंद्रजींना उमेदवार मागे घेण्याची साद खुद्द राज ठाकरेंनी घातली आहे..
मनसेची भूमिका असल्याचे सांगत ठाकरे यांनी रमेश एक चांगला कार्यकर्ता होता, त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला उमेदवारी देणे हाच रमेश याच्या आत्म्याला शांतीचा मार्ग असेल असे वक्तव्य खुद्द ठाकरे यांनी केले आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांनी काय लिहीलंय पत्रात?
प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र! एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
दिवंगत रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे.
आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
सहानुभूतीपेक्षा व्यवहारीक भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपकडून या विनंतीला काही मान दिला जाईल का याविषयी प्रश्नचिन्हच आहे. अर्थात वरकरणी राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रामागे लटके यांच्याविषयी सहानुभूतीचा विषय आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांचा मात्र यामागे महाशक्ती असावी असाही कयास आहे.
ठाकरे यांनी पत्र लिहीले असले तरी प्रत्यक्षात मुंबईत भाजपविषयी मराठी माणसांमध्ये असलेला रोष आणि वस्तुस्थिती लक्षात आली असल्याने व कदाचित यापुढील काळात महापालिकेसाठी राज ठाकरे यांची मनसे भाजपबरोबर राहील्यास या रोषाची तीव्रता कमी करण्याचाही यामागे हेतू असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे पत्रकार विजय चोरमारे यांनी यावर ट्विट करीत टिका केली आहे, चोरमारे म्हणतात, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना जी छळवणूक झाली तेव्हा राज ठाकरे यांना पत्र लिहावेसे वाटले नाही. ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप झाला तेव्हाही काही वाटले नव्हते. मित्रपक्षांचा पराभव,नव्या मित्राची नामुष्की दिसू लागल्यावर मात्र राज ठाकरे यांना जाग आलेली दिसते.