मुंबई : महान्यूज लाईव्ह
परवाच पुण्यात बसचालक बस थांबवत नसल्याने ‘ वाचवा, वाचवा ‘ करणाऱ्या एका प्रवाशाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला, आता मराठी अभिनेत्री मनवा नाईकने तिच्यावर गुदरलेला प्रसंग फेसबुक पोस्टव्दारे शेअर केला आहे. मुंबईमध्ये उबेर ट्रॅक्सीतून प्रवास करताना कारचालकाने गैरवर्तन केलेच, पण त्याला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनवालाही ‘ रुक, तुझे देखताहू अभी ‘ अशा शब्दात धमकीही दिली.
मनवाने फेसबुक पोस्टवर लिहल्याप्रमाणे रात्री सव्वाआठ वाजता ती उबेरमध्ये बसली. वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पोचले तेव्हा उबेर चालक फोनवर बोलत होता. त्यानंतर त्याचे बीकेसी येथे सिग्नल तोडला. वाहतुक पोलिसांनी अडवले असता त्यांच्याशीही वाद घातला. प्रत्येकवेळी मनवाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. वाहतुक पोलिसांशी हुज्जत सुरु असताना मनवाने पोलिसांना विनंती करून जाऊ देण्यास सांगितले. त्यावर त्याने गाडी सुरु असतानाच मनवाशीच भांडायला सुरुवात केली. त्यानंतर मनवाने त्याला पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले. त्यानंतर बीकेसीच्या जिओ गार्डनच्या अंधाऱ्या जागेत गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मनवाने त्याला गाडी थांबवू दिली नाही. त्यानंतरही त्याने कुर्ला पुलावरही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या काळात तो मनवाशी सतत भांडत होता. थांब, तुझ्याकडे बघतोच आता, या शब्दात तिला धमकावत होता. त्यानंतर मनवाने उबरच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळीही चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. चुनाभट्टी रोडवर प्रियदर्शनी पार्कमध्ये गाडी थांबवण्यास सांगूनही चालकाने गाडी थांबवली नाही. याउलट त्याने कोणालातरी फोन केला.
यानंतर मनवाने आरडाओरडा करण्यात सुरुवात केली. त्यानंतर दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने तिला गाडीतून बाहेर पडण्यास मदत केली. या सगळ्या प्रकारात मनवा सुरक्षित असली तरी चांगलीच घाबरली आहे. मुंबईसारख्या शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या प्रसंगाने ऐरणीवर आला आहे.