भोर : महान्यूज लाईव्ह
कोराना आणि त्यानंतरचा एसटी कामगार संपामुळे रुळावरून घसरलेली एसटी महामंडळाची गाडी अजूनही जागेवर आलेली नाही. यापूर्वी अनेक गावात सुरु असलेली एसटीची सेवा अजूनही पूर्णपणे सुरु होऊ शकली नाही. भोर तालुक्यातील टिटेगाव गावाच्या ग्रामस्थांनी यासाठी एसटी महामंडळाला पत्र देऊन एसटीच्या फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी विनंती केली आहे.
भोरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या टिटेघरला कोरानापुर्वी दिवसातून तीन वेळा एसटी बस येत असे. शाळेचे विद्यार्थी, नोकरदार, भोरला विविध कामांसाठी जाणाऱ्या लोकांना याच बसचा आधार असे. कोरोनामध्ये ही सेवा बंद पडली, ती जवळपास दोन वर्षे बंद राहिली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने यात भर घातली. पण आता सगळी परिस्थिती सुरळीत होऊनही टिटेघर गावासाठीच्या एसटीच्या फेऱ्या मात्र नियमित सुरु झालेल्या नाहीत. याचा मोठा फटका विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसतो आहे. यासाठी या एसटीच्या फेऱ्या नियमित सुरु कराव्या अशी विनंती टिटेघर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने एसटीच्या भोर आगाराच्या व्यवस्थापकांना करण्यात आली आहे. सकाळी ९, दुपारी १ आणि संध्याकाळी ५ वाजता अशा दिवसातून तीनवेळा एसटीची सेवा मिळावी अशी मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे.
एसटीचे भोर आगार येथे आगार व्यवस्थापक कदम प्रत्यक्ष भेटून टिटेघर ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर तावरे, आनंदानवघणे, प्रहार शाखा अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी हे पत्र दिले आहे. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले आहे.