बारामती -महान्यूज लाईव्ह
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरातील बालेकिल्ल्याला कॉंग्रेसने मोठा धक्का दिला. १३ तालुक्यांमध्ये केवळ दोन उपसभापतीपदे भाजपला मिळाली, तर कॉंग्रेसने आपला डंका वाजवत ९ पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व मिळवले.
बारामतीत येऊन बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी बावनकुळे यांनी पहिले पाऊल ठेवताच पत्रकार परीषद घेतली व त्या पत्रकार परीषदेत किसीका कोई गड नही होता अशी घोषणा फेकून बारामतीत आम्ही जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता.
त्या बारामतीतून जाऊन एक महिनाही होत नाही, तोच प्रदेशाध्यक्षांच्या पारंपारिक बालेकिल्ल्यात पंचायत समिती हातात उरली नाही अशी भाजपची स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने सभापती, उपसभापतीपदासाठी कॉंग्रेसच्या इच्छुकांना गळाला लावण्यासाठी जंग जंग पछाडले, मात्र तेही जमले नाही.
कॉंग्रेसला जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, भिवापूर, कुही, कळमेश्वर, सावनेर, कामठी, उमरेड, पारशिवनी, मौदा या पंचायत समित्या मिळाल्या, तर राष्ट्रवादीला हिंगणा, काटोल, नरखेड पंचायत समित्या मिळाल्या. भाजपला केवळ रामटेक व मौदा तालुक्यात पंचायत समितीचे उपसभापतीपद पटकावता आले.