सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईबाबत दिरंगाई करण्यात येत असल्याने
गोहत्या प्रतिबंधात्मक कायद्यानुसार इंदापूर नगरपरिषदेला मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी
यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर देखील कर्तव्यामध्ये कसून केल्यास न्यायालयामध्ये
इंदापूर नगरपरिषदेच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा स्वामी यांनी दिला आहे.
शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर नगरपालिका हद्दीमध्ये पोलिसांच्या सहाय्याने वेळोवेळी
धाडी टाकून कसाई गल्ली मध्ये कारवाई केलेली आहे. इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये कत्तलखान्यांच्या मालकांविरुद्ध
गुन्हे नोंद झालेले आहेत. २०१९ पासून आतापर्यंत गुन्हे नोंद होत असताना प्रत्यक्ष इंदापूर नगरपालिकेकडून
कोणतेही सहकार्य मिळत नाही.
स्वामी पुढे म्हणाले, इंदापूरमधील अवैध कत्तलखान्यामध्ये गाई, बैल, वासरे, म्हशी व शेती उपयोगी जनावरे
आणली जातात. अवैध कतलखान्यात त्या जनावारांची क्रूरतेने कतल करून ते गोमांस पुणे मुंबईला पाठविले जाते.
तेथून विजापूर बेंगलोर मार्गे ते परकीय देशात व्हिएतनाम, दुबई येथे निर्यात केले जाते. याचा अर्थ इंदापूर हे गोमांस
विक्रीचे आंतरराष्ट्रीय केंद्र झाले असून मोठी आर्थिक उलाढाल येथे होत आहे. ‘अल कबीर’ ही आंतरराष्ट्रीय
कंपनी असून तिच्या माध्यमाने इंदापूर मधील गोमांस विक्री जगभर केली जाते. इतके गंभीर प्रकरण इंदापूरमध्ये
सुरु आहे. सध्या ८ ते १० कतलखाने कसाई मोहल्ल्यात असून भिंतीचे बांधकाम व पत्र्याचे शेड असे त्याचे स्वरूप आहे.
त्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही. येथील कत्तलखाना मालक गुन्हे दाखल होऊनसुद्धा खुलेआम
फिरत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी या कायदेशीर नोटीसीद्वारे नगरपरिषदेला
कारवाईबाबतचा अंतिम इशारा देण्यात आला आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसाच्या आत बेकायदेशीर
कत्तलखाने कारवाई करुन पाडून टाकावे, अन्यथा न्यायालयामध्ये कायदेशीर कारवाईला सामोरे जावे
लागेल, अशा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.