राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : या देशात जात-पात आणि धर्म भेदामुळे विषमतेचे विष मुठभर लोकांकडून पसरवले जात आहे. या वर्णभेद, जात, धर्म भेदभावामुळे आज देश विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असून याचे गंभीर परिणाम देशाला आणि समाजाला भोगावे लागत आहे. असे मत सावित्री -फातेमा विचारमंचाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक सय्यद यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे कै. एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ( दि.१५) आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत “जाती-पाती च्या पलीकडे कर्तृत्व श्रेष्ठ ” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी डॉक्टर सय्यद म्हणाले की, या समाजाला सर्व संतांनी आणि महापुरुषांनी जात-पात धर्म भेदभाव न पाहता माणुसकीची शिकवण दिली. जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, विषमता नाकारून समनता, बंधुभाव, प्रेम, नितीमत्ता, शील, चारित्र या पद्धतीने जीवन जगण्याची व वागणुकीचा संदेश देत मार्ग दाखवला. आज भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा रोज घेतली जाते मात्र ती रोजच्या जीवनात आचरणात आणली जात नाही अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
विज्ञान हे वरदान असून या विज्ञानाची शिकवण संत कबीर ,संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर , महंमद पैगंबर यासारख्या सर्व संतांनी दिली. म्हणून आजच्या युवकांनी विज्ञान युगात वावरताना जातीपाती आणि धर्म- वर्णभेद याला थारा न देता हा देश माझा आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत या प्रमाणेच वागले पाहिजे.
डॉक्टर, वकील, इंजिनिअर, क्लासवन अधिकारी होणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर हे शिक्षण माणसासाठी, समाजासाठी, देशासाठी उपयोगी पडले पाहिजे. सध्या शिक्षणाचा, ज्ञानाचा आणि पदाचा उपयोग हा फक्त पैसे कमवण्यासाठी आणि भ्रष्टाचारासाठी केला जात आहे. सध्या शिक्षित वर्गाकडूनच हुंडा बळी, स्त्रीभ्रूण हत्या या सारखे प्रकार घडत असून हे समाजाला घातक आहे. असे मत सय्यद यांनी व्यक्त केले.
यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे म्हणाले की, सध्या सोळा ते सतरा वर्षाच्या आतील मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींनो आपले आई -वडील आपल्या शिक्षणासाठी , आपल्या आयुष्याचे कल्याण होण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करतात त्यांना धोका देऊ नका.
तुम्हाला शिक्षणासाठी शाळेत पाठवले ते शिक्षण एक जबाबदारी म्हणून घ्या, पळून जाऊन आपल्या आई-वडिलांची मान समाजात घालू नका आणि त्यांना पोलीस चौकीची पायरी चढू देऊ, विद्यार्थिनींनी शिस्तीने वागले पाहिजे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी हसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग यांचा आदर्श आजच्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. असे मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना इतिहासाचे विविध दाखले देत मौलिक असा संदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना दिला.
दरम्यान, यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा योगिनी दिवेकर, दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी विजय चव्हाण, मिलिंद जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, काँग्रेसचे कार्यकर्ते विठ्ठल दोरगे तसेच प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.