दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील प्रदूषण करणाऱ्या व भेसळयुक्त गुळ तयार करणाऱ्या गुऱ्हाळांवर अन्न व औषध प्रशासन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने धाड टाकून कारवाई केली. याचे सर्वत्र स्वागत होत आहे, मात्र दौंडच्या कॉंग्रेसने एका मुख्य मुद्द्याकडे लोकांचे लक्ष वेधून एका नव्या प्रश्नाला तोंड फोडले आहे. दौंड तालुक्यात ७०० च्या वर गुऱ्हाळे आहेत आणि केवळ दोन- तीन गुऱ्हाळांचीच तपासणी झाली.. त्यामुळे पुढच्याच ठेच मागचा शहाणा.. ही गोष्ट प्रत्यक्षात घडावी आणि गुऱ्हाळांना वचक बसून आज जे गुऱ्हाळांमध्ये व्यवसायातील अनैतिकता सुरू आहे, ती कमी व्हावी, अन्यथा पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण वेगळ्या अर्थाने गुऱ्हाळचालकांनी घेऊ नये.. एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे..
कॉंग्रेसने यासंदर्भात एफडीआय व एमपीसीबी च्या कार्यालयांना निवेदन दिले आहे. मात्र त्यापू्र्वीच दौंड तालुवक्यात एक चर्चा अतिशय महत्वाची होती… ती म्हणजे अशी की, दिवाळसण तोंडावर असल्याने भेसळयुक्त गुळ सामान्यांच्या व कच्च्याबच्च्यांच्या पोटात जाऊ नये यासाठी पोटतिडीकीने व कर्तव्यास जागून कारवाई करावी, जेणेकरून ही दिवाळी आरोग्याची, भेसळीपासून वाचणारी जावी… अन्यथा गेल्या काही दिवसांपासून परिसरात जी चर्चा सुरू आहे की, अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यात ७०० च्या वर गुऱ्हाळघरे चालू असून केवळ दोन- तीन गुऱ्हांळावर छापा टाकून कारवाई केली आहे, त्याचा विचार करता जर गुऱ्हाळांना धाक बसला नाही, गुऱ्हाळे सरळ रेषेत चालली नाहीत, तर सर्वचजण समजून घेतील की, कोणाची दिवाळी चांगली गेली..!
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने मर्मावर बोट ठेवत या दोन्ही प्रशासनाने कारवाई केल्याचा फार्स करू नये, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. काँग्रेस (आय) पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी अन्न व औषध प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदनाद्वारे दिला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड, कानगाव तसेच केडगाव, पारगाव, सहजपूर, खामगाव ,नानगाव या परिसरातील गुऱ्हाळांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, चपला व टायर व आरोग्यास घातक असलेले साहित्य मोठ्या प्रमाणात जाळले जात आहे. परिणामी गुऱ्हाळांच्या धुराड्यांमधून निघणाऱ्या काळया कुट्ट धुरांमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही बहुतांश गुऱ्हाळघरे ही लोकवस्तीत आहेत. परिणामी प्रुदुषणांमुळे या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या दौंड तालुक्यात दम्याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या गुऱ्हाळांच्या धुरामुळे शेतपिके ही धोक्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसापूर्वी केडगाव- दापोडी परिसरातील तीन-चार गुऱ्हाळांवर छापा टाकून भेसळयुक्त गुळ तयार करताना पकडले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त गूळ ताब्यातही घेतला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही वरवंड परिसरातील एका गुऱ्हाळावर छापा टाकून कारवाई केली होती. मात्र प्रशासनाच्या या दोन्ही विभागाने केवळ दोन-चार गुऱ्हाळांवर तात्पुरती कारवाई करून मोठी कारवाई केल्याचा गाजावाजा करू नये अशी अपेक्षा कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.
येत्या काही दिवसांवर दिवाळसण तोंडावर आला असून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त गुळ बनवून तो बाजारपेठेत उपलब्ध केला जात असल्याची शंका आहे. हा गुळ दुकानातून घरात पोहोचणार आहे. याबाबत यापुर्वीही काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसिलदार, संबंधित विभागाचे मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे भेसळयुक्त गुळ तयार करणाऱ्या व प्रदूषण करणाऱ्या इतर गुऱ्हाळांवर व चालक व मालक यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसे न झाल्यास या दोन्ही जबाबदार प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रोहित बनकर यांनी दिला आहे.