सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर पोलिसांनी आज ५० लाखांचा २१८ किलो गांजा पकडून दोन गाड्याही पकडल्या. तब्बल ८० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल इंदापूर पोलिस व पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडला.
बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळाल्यावरून सरडेवाडी टोलनाक्यानजिक सापळा रचला. बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ह्युंडाई कंपनीची (एमएच०५ सीएम ८५००), टाटा कंपनीची हॅरीअर (एमएच४२ बीई ४९२५) ही दोन वाहने सोलापूर रस्त्याने पुणे बाजूकडे निघाली होती. पोलिसांनी ही वाहने टप्प्यात आली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही वाहने न थांबल्याने पोलिसांनी मग गाड्यांचा पाठलाग केला.
अखेर ही वाहने सोनमाथ्यानजिक सोनाई दूध प्रकल्पानजिक गाड्या थांबवल्या. मग चालकाला ताब्यात घेतल्यानंतर वाहनांची तपासणी केल्यानंतर गांजा दिसून आला. विशाखापट्टणम येथील व्यापारी तो गांजा विक्रीसाठी नेणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी बारामती तालुक्यातील मळद येथील अमीर गुलाब मुलाणी, प्रकाश राजेंद्र हळदे (रा. सातव शाळा, बारामती), खंडू अश्रू परखड (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती, मूळ रा. लोणी. ता जामखेड, जि. नगर) रोहन काशिनाथ जगताप (रा. देसाई इस्टेट, क्रिडा संकुल मागे बारामती) सूरज भगवान कोकरे (रा. हनुमानवाडी, पणदरे, ता. बारामती) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, इंदापूरचे पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक निरीक्षक प्रकाश पवार, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, फौजदार दाजी देठे, सुधीर पाडूळे, गणेश जगदाळे, अभिजीत एखशिंगे, गणेश जगदाळे, अमित शिद, बाळासाहेब कोरडे, सलमान खान, विकास राखुंडे, विशाल चौधर, मंगेश थिगळे, दगडू वीरकर, काशिनाथ राजपुरे, युवराज कदम, बापू मोहिते यांच्या पथकाने केली.