पुणे – महान्यूज लाईव्ह
अॅपच्या माध्यमातून खंडणीची मागणी करीत मॉर्फ व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, दुसरीकडे सोशल मिडीयातही आधी मेसेज, मग कॉल.. मग व्हिडीओ कॉल करून मग नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीतून पैसे उकळण्याचे प्रकारही वाढले आहेत.
पुण्यात शंतनू वाडकर या १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने हे प्रकरण आता गंभीर बनत चालल्याची जाणीव करून दिली आहे. ३० सप्टेंबर रोजी पुण्यातीस धनकवडी परिसरातील अमोल गायकवाड या २२ वर्षीय तरुणानेही आत्महत्या केली आहे.
शंतनूशी इन्स्टाग्रामवर प्रित यादव या अनोळखी नावाने कोणीतरी चॅटिंग करीत होते. या महिलेने अधिक ओळख वाढवत फोटो मागवून ते मॉर्फ करून नग्न फोटोद्वारे आपल्याशी चॅटींग केल्याचा आरोप केला होता. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिने साडेचार हजार मागितले. ते पैसे पाठवल्यावर पुन्हा अधिक पैसे मागितले. मग तेवढ्यावर न थांबता त्या अनोळखी महिलेने शंतनूच्या नजिकच्या मित्रांना हे फोटो पाठवले. त्यावरून सातत्याने धमकी दिली जात असल्याने शंतनू याने २८ सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
व्हाटसअपवरून अनोळखी महिला हाय, हॅलो करते. मग ओळख वाढवते. या ओळखीतून व्हिडीओ कॉल करून समोरच्या व्यक्तीला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर नग्न व्हिडीओ मोबाईलवरील फ्रेंड लिस्ट, फोन कॉल लिस्टला हॅक करून तिकडे पाठविण्याची धमकी देते. असे प्रकार सध्या वाढत चालले आहेत.
पुण्यातील दोनच नव्हे तर नागपूर येथेही असाच प्रकार घडला आहे. सोशल मिडीयावरन होणाऱ्या लैंगिक शोषणाचाच हा एक प्रकार असून याबाबत अधिक कठोर कारवाई न झाल्यास अनेक तरुणांच्या, तरुणींच्या आत्महत्या होतील.