भोर – महान्यूज लाईव्ह
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे कालपासून बेपत्ता होते. मात्र त्यांची गाडी सारोळा गावाजवळ उङी होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते निरा नदीच्या दिशेने चालत गेल्याचे दिसल्याने त्यांनी नीरा नदीत उडी मारली असावी असा कयास बांधला जात होता. तो अखेर खऱा ठरला असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीशेजारी घोरपडे यांचा मृतदेह आढळून आला.
राज्याच्या पणन खात्याच्या सहसंचालकाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली असून घोरपडे हे साताऱ्याचे मूळ रहिवासी होते. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची खबर पोलिसांकडे दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात निरा नदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून ते नीरा नदीकडे जात असताना दिसले, त्यामुळे अनेकांच्या मनातील पाल चुकचुकली होती. मात्र नदीपात्रात त्यांनी उडी मारल्याचे दिसत नव्हते.
आज एनडीआरएफसह महाबळेश्वर ट्रेकर्स, भोईराज स्वयंसेवक, शिरवळ रेस्क्यू आदींचे स्वयंसेवक येथे शोध घेत होते. राजगड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन पाटील, पोलिस नाईक गणेश लडकत, शिरवळच्या फौजदार वृषाली देसाई, सहायक फौजदार अनिल बारेला आदींसह ४० जणांचे पथक यामध्ये कार्यरत होते.