रावणगावातील त्या तीन महिलांच्या अपघाती निधनानंतर गाव शोककळात बुडाले!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड: तालुक्यातील रावणगाव येथे काल गुरुवारी शेतातील पडलेल्या टोमॅटो गोळा करून कॅरेटमध्ये भरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून घरी निघालेल्या रावणगाव परिसरातीतील नऊ शेतमजूर महिलांवर काळाने झडप घातली. वाहनचालकाचा ताबा सुटल्याचे निमित्त झाले, पण अनेक हसती खेळती घरं उध्वस्त झाली. रावणगावच्या त्या वस्तीवर सकाळी हसणाऱ्या चेहऱ्यावर अवघ्या सहा तासात शोककळा पसरली होती.
टोमॅटो भरून घेऊन शेतातून बाहेर निघालेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली खडकवासला कालच्या ३२ नंबर फाट्यावरून पलटी होऊन भीषण अपघात घडला. ही ट्रॉली अंगावर पडल्याने व ती वेळेत उचलली न गेल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने उपचरापूर्वीच या अपघातात दोन सख्ख्या जावा, एक महिला व चार पाच महिला जखमी झाल्याची घटना घडली.
गुरुवारी (दिनांक १३) घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे रावणगाव परिसरात क्षणातच दुःखाचा डोंगर पसरला. या अपघातात सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसो पानसरे,अश्विनी प्रमोद आटोळे तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे, मीना बापू आटोळे,अनिता धनाजी साळुंखे, आक्का सुदाम साके, कावेरी माणिक आटोळे, उषा राजेंद्र आटोळे या महिला किरकोळ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.
या अपघातात मृत्यू झालेल्या सुरेखा बाळू पानसरे व रेश्मा भागुजी पानसरे या सख्ख्या जावा आहेत. दुपारी जेवण करून काम मिळाल्याने टोमॅटो भरण्यासाठी गेल्या, मात्र काम करून परत त्या घरी परतल्याच नाहीत. या नऊही महिला एकाच वस्तीवरील व शेजारी शेजारी राहणाऱ्या आहेत.
अल्पभूधारक शेतमजूर व रोजंदारीवर काम करणाऱ्या या महिला मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बोरीबेल, मळद, रावणगाव, लोणारवाडी, खडकी या आसपासच्या गावांमध्ये जाऊन त्या मिळेल ते काम रोजंदारीवर करतात.
नेहमीप्रमाणे गुरुवारी त्यांनी रावणगावातील शेतकरी बाबुराव आटोळे यांच्या टोमॅटोच्या पिकात टोमॅटो गोळा करून भरण्याचे काम मिळाले होते. मात्र हे काम त्यांच्या आयुष्यच हिरावून नेणारे अखेरच काम ठरले. ह्या घटनेची माहिती मिळतात परिसरातील ग्रामस्थांनीही घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.
जेसीबी मशीन बोलावून ट्रॉली उचलण्यात आली. मात्र हे सर्व करताना एक तासाचा कालावधी उलटून गेला. त्यामुळे तीन महिलांचा त्या ठिकाणी जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. इतर जखमी महिलांना त्वरित भिगवण व दौंड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.