सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व लहानपणापासूनच गरिबीचे आर्थिक चटके सोसत संघर्षमय जीवन जगत पोलीस क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या विरोधात प्रभावी कामगिरी करत तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना हा सन्मान काल (दिनांक १३ ) राजभवन, मुंबई येथे देऊन सन्मानित करण्यात आले. शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या नागनाथ पाटील यांना जीवनामध्ये लहानपणापासून गरिबीचे चटके सोसावे लागले आहेत.
आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आपल्या ध्येयाच्या पुढे संघर्षमय जीवन जगत त्यालाही झुकवत त्यांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत पोलीस क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पाटील हे इंदापूर पोलीस ठाणे अंतर्गत बावडा पोलीस चौकी येथे सध्या कार्यरत आहेत.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असणाऱ्या नागनाथ पाटील यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या झालेल्या गौरवामुळे इंदापूर पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांचे इंदापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
नागनाथ पाटील हे मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण गावचे सुपुत्र असून सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरती पुणे ग्रामीण इंदापूर पोलीस स्टेशन येथे गेले एक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दामाजी कारखाना, माध्यमिक शिक्षण, श्री. विलासराव देशमुख प्रशाला, कारखाना, उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढा इथून पूर्ण केले तसेच स्वेरी कॉलेज, गोपाळपूर येथून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यानंतर पुणे येथील भोसरी एमआयडीसीमध्ये नामांकित कंपनीत नोकरी मिळाली.
घरची परिस्थिती बेताची, दोन भाऊही शिक्षण घेत होते. आईवडील शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती, त्यामुळे स्पर्धा परीक्षा करायची तीव्र इच्छाशक्ती असतानाही दुसऱ्या भावाला नोकरी मिळेपर्यंत कंपनीमधील खाजगी नोकरी करावी लागेल अशी अट घरच्यांची होती.
लहानपणापासून आई-वडिलांसोबत कष्ट करत शिक्षण घेतलेले असल्याने नाराज न होता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून पुढे काही करून पुढे जायचे हे निश्चित असल्याने खाजगी कंपनीतील नोकरी करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सन २०१३ साली पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरला आणि पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले.
त्यानंतर खाजगी कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेला देण्याचा निर्णय घेतला. PSI मुख्य परीक्षा मध्येही चांगले गुण मिळाले. शारीरिक चाचणी व मुलाखतीचे जोरदार तयारी करून अंतिम यादीमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. सदरच्या शैक्षिणिक प्रवासामध्ये आई वडील, भावंडाने , मामांनी व सर्व उचेठाण गावातील ग्रामस्थ यांनी पाठीशी उभारून खंबीरपणे साथ दिली.
त्यानंतर २०१५ साली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथून पोलीस खात्यातील प्रथम नियुक्ती नक्षलप्रभावित, अतिदुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात झाली. त्या ठिकाणी उप पोलीस स्टेशन डांमरचा येथे नेमणूक केली. येथे एक वर्ष सेवा बजावल्यानंतर तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी उप पोलीस स्टेशन,दामरंचा येथून विशेष अभियान पथक (सी-६०), प्राणहिता येथे बदली केली.
विशेष अभियान पथक, प्राणहिता येथे कार्यरत असताना, तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शैलेश बलकवडे व अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानामध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या १० चकमकीमध्ये त्यांच्या सहकारी यांना सोबत घेऊन नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात, ८ नक्षलवाद्यांना अटक करण्यामध्ये, २ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यामध्ये यश आले.
त्यांच्या या शौर्य पूर्ण कामगिरीबद्दल 26 जानेवारी 2021 रोजी त्यांनु ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल विरोधी अभियानामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी ‘पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक’ अशी वेगवर्दीत पदोन्नती दिली.
१ मे २०२१ रोजी ‘पोलीस महासंचालक पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले आणि काल 13 ऑक्टोंबर 2022 रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान इंदापूर बार असोसिएशनचे सचिव ॲड. आशुतोष भोसले यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.