मुंबई – महान्यूज लाईव्ह
ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारण्याबाबत मुंबई महापालिकेचे आय़ुक्त इक्बालसिंह चहल यांनी महिना लागणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर उध्दव ठाकरे गटाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. उच्च न्यायालयाने लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश दिल्याने ठाकरे गटाला व लटके यांच्या उमेदवारीलाही मोकळा मार्ग मिळाला.
दरम्यान या निकालानंतर शिवसेनेने जल्लोष केला आहे ऋतुजा लटके यांचा राजीनामा सकाळी अकरापर्यंत मंजूर करा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून उद्या अर्ज सादर करण्याचीही अंतिम मुदत आहे. लटके या उद्या शिवसेना उध्दव ठाकरे यांच्याकडून अर्ज सादर करणार आहेत.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. या ठिकाणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र चिन्ह व पक्षाच्या नावाची समस्या उदभवली. पुढे यात निवडणूक आयोगाने चिन्ह व पक्षाचे नाव दिल्यानंतर लटके यांच्या राजीनाम्याची अडचण तयार झाली.
लटके यांनी महापालिकेचा राजीनामा दिला होता. मात्र तो मजूर होत नव्हता. राजीनामा मंजूर होईपर्यंत लटके यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नव्हता. त्यावरून उध्दव ठाकरे यांची शिवसेना उच्च न्यायालयात गेली. अखेर उच्च न्यायालयाने लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिला.