दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील शिरापूर येथील भीमा नदीच्या पात्रातून यांत्रिक फायबर बोटीच्या साह्याने बेकायदा वाळू उपसा करून व त्याची ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करणाऱ्यांवर दौंड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
या प्रकरणी चार वाळू चोरांवर गुन्हा दाखल केला असून एक ट्रक व फायबर यांत्रिक बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. संदीप महादेव कापसे, रामचंद्र जानदेव कापसे, भाऊसाहेब भानुदास होलम, आकाश एकनाथ कापसे (सर्व रा. शिरापुर ता.दौड़ जि पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाळूचोरांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरापूर येथे भीमा नदीच्या पात्रात मागील काही दिवसांपासून यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरू होती.
याबाबत माहिती मिळाल्याने दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बुधवारी ( दि.१२) रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास शिरापुर हद्दीत भीमा नदीच्या पात्रालगत सार्वजनिक शासकिय गायरानामध्ये ही कारवाई करण्यात आली.
सक्शन बोट व फायबर बोट वरील चालक व कामगार यांच्या मदतीने भिमा नदीच्या पात्रातून बेकायदा बिगर परवाना वाळू उपसा करून तो जे सी बी च्या साह्याने वाळु ट्रकमध्ये भरून देत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रकमधील दोन ब्रास वाळुसह ट्रक ताब्यात घेतला.
पोलीस नाईक किरण राऊत यांनी फिर्याद दिल्याने ह्या चार वाळू चोरांवर खान व खनिज (विनियमन व विकास) अधिनियम, पर्यावरण कायदा, सार्वजनिक मालमता नुकसान करणे या कायद्यांतर्गत दौंड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.