बारामती – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील बाबीर देवाच्या रुई गावात राष्ट्रीय समाज पक्षाने जंगी मेळावा घेऊन बारामती लोकसभेचे रणशिंगे फुंकले.. त्यामुळे बारामती लोकसभेला आता राष्ट्रवादी- भाजप- रासप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
माजी मंत्री महादेव जानकर हे भाजपचे मित्रपक्षाचे प्रमुख आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जानकर हे भाजपपासून दूर जाताना दिसत आहेत. जानकर यांना भाजपकडून मिळालेल्या वागणूकीची सल टोचते आहे. एकीकडे राहूल कुल यांना राष्ट्रीय समाज पक्षासाठी जागा सोडली आणि दुसरीकडे एबी फॉर्म देऊन कुल यांना भाजपचे उमेदवार बनविण्याची खेळी भाजपने केली होती. ते जानकर विसरलेले नाहीत.
भाजप ताकदवान पक्ष आहे, मात्र मित्रपक्षांच्या ताकदीमुळेच तो ताकदवान बनला असल्याचे वारंवार जानकर सांगत आले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपशी जुळवून नाही, तर स्वतःच्या पक्षाच्या विचारधारेला बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहीले आहेत.
आता इंदापूर तालुक्यातील बाबीर देवस्थानच्या गावात म्हणजे रुई येथे रासपचा मेळावा आयोजित केला होता. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी बारामतीत तगडा पर्याय केवळ जानकरसाहेबच आहेत असे सांगत बारामती लोकसभा निवडणूकीसाठी जानकर उमेदवार असणार हे अधोरेखित केले.
महादेव जानकर यांनी सन २०१४ च्या मोदी लाटेत बारामती लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना दिलेली टक्कर बारामतीकर विसरलेले नाहीत. ६९ हजारांच्या मतांच्या फरकाने जानकर हरले. मात्र त्यांनी दिलेली लढत नंतरच्या काळात सन २०१९ मध्ये कांचन कुलही देऊ शकल्या नव्हत्या. भाजपच्या मतात वाढ झाली, मात्र पराभवाचे मतांचे अंतरही वाढलेले होते.
त्यामुळेच येथे टक्कर देतील, तर ते फक्त महादेव जानकर हेच असे गणित मांडत राष्ट्रीय समाज पक्षाने आता या मतदारसंघावर दावेदारी केली आहे.