संपादकीय..
राज्यात चिन्ह आणि नावाची लढाई संपली.. आता सारं काही शांत होईल.. असं म्हणतानाच राजकारणातील विकृती लगेच पुढचे लक्ष्य गाठताना दिसतेय. त्याची प्रचिती अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीत दिसू लागली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत शिवसेनेला म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदारांची सहानुभूती आहे हे लक्षात येताच राजकारणातील नवा डाव सुरू झाला आहे. जर भाजपचा उमेदवार येथे पराभूत झाला, तर राज्यात भाजपविरोधी वातावरणाचा संदेश जाईल, कागदोपत्री तरी आजच्या क्षणी ठाकरे गटाला वातावरण दिसते आहे, मग त्याचे पाप आपल्या माथी नको, म्हणून कालपर्यंत या मतदारसंघात उमेदवार द्यायला नको म्हणणारी बाळासाहेबांची शिवसेना अचानक या मतदारसंघात उमेदवार द्यायला तयार झाली. मग असेही ठरले की, शिंदे गटाने उमेदवार दिला, तर भाजपने उमेदवार द्यायचाच नाही. मग असेही ठरले की, जर दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा यांनाच शिंदे गटाने उमेदवारी द्यायची असा आरोप शिवसेनेने केला आहे. यात तथ्य दिसावे इतपत काही गोष्टी नजरेत भरू लागल्या आहेत.
पाच दिवसांपूर्वी ऋतुजा लटके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा माध्यमांनी चालवली.. मग ऋतुजा लटके यांचा महापालिका सेवेतील राजीनामा स्विकारण्यास मंहिना लागेल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले.. मग ऋतुजा लटके यांना मंत्री करू असे आश्वासन देत सत्तांतरानंतरची पहिली लढाई जिंकण्याची शिंदे गटाची तयारी सुरू झाली.. मात्र त्यापेक्षाही अगोदर भाजप लढणार असलेल्या या जागी भाजप का शिंदे गटाला ऐन वेळी पुढे करतोय, याचे कोडे अगदीच उलगडत नाही असे नाही.
राजकारण कोणत्या थराला गेलंय याची ही एक प्रातिनिधीक विकृत गंमत आहे, जी महाराष्ट्रातील जनतेने फक्त शांतपणे पाहायची आहे. या साऱ्यामागे कोणती महाशक्ती आहे हे जनतेला कळते, मात्र एकही नेता थेटपणे यावर बोलत नाही यावरून राजकारणातील वाढत चाललेली दहशत किती भयानक आहे याचा अंदाज येऊ शकेल.
अर्थात याला जबाबदार आपल्याच लोकशाहीची बिघडलेली तत्वे दिसत आहेत. जो लोकशाहीचा चौथा स्तंभ सन २०१४ पूर्वी अत्यंत निडरपणे कोणालाही लक्ष्य करून चुका शोधायचा, तो निवडणूकीच्या वेळी मिळणाऱ्या पॅकेजमध्ये एवढा नागडा झाला आहे की, आता तर त्याच्या बातम्या कोणत्या चालवायच्या आणि कोणत्या छापायच्या हेही वरूनच ठरून येऊ लागले आहे. त्यामुळे त्याला आता कोणाच्या चुका आहेत हे स्पष्टपणे सांगायचा नैतिकही आणि अनैतिकही कोणताच अधिकार राहीलेला नाही. बटीक झालेली प्रसारमाध्यमे आता फक्त कंबरेचे डोक्याला गुंडाळल्यानंतर उरलीसुरली चड्डीही जी घरंगळते आहे ती सावरण्याचा अपयशी प्रयत्न करताना दिसत आहे.
लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा पार चोथा झाल्यानंतर न्यायव्यवस्था व प्रशासन यंत्रणेकडेही बोट दाखविण्याच्या पलीकडची अवस्था दिसू लागली आहे. त्यातच आता अत्यंत वेगाचे व इन्स्टंट राजकारण सुरू झाले आहे. काही कळायच्या आत अनेक घडामोडी घडताना व काहीच अंदाज लावता येत नसलेल्या घडामोडी पाहताना महाराष्ट्राची जनताही हतबध्द झालेली पाहायला मिळते आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अगोदर लढत होईल, ती एकदम तुल्यबळ होईल असा जो अंदाज भाजपचा होता, तो कदाचित चुकत असल्याने भाजपने राजकारणातील चाणक्यनिती वापरत शिवसेनेचेच दोन गट आपसात भिडवून मजा बघायची ठरवल्याचे दिसते. यातून ठाकरे गटाला शह बसलाच तर मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्याच हातात याचा भाजपला विश्वास आहे, त्यामुळे ताकही फुंकून पिताना भाजपने आपला हात आखडता घेतला आहे.
प्रत्येक गोष्टीत अप्रत्यक्षरित्या पाठीमागे किंवा पडद्याआड राहून भाजप हा शिंदे गटाला पुढे करीत असल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत असतानाही कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता थेट भाजपवर वार करताना दिसत नाही. आणि आपलेच घर फोडले जाताना गलितगात्र बनलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेला प्रत्येक गोष्टीत बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत असून राजकारणातील अत्यंत विदारक परिस्थितीचा सामना त्या पक्षाला करावा लागत आहे.
अगोदर चिन्ह, मग नाव यात फेरबदल झाल्यानंतर, मग उमेदवारही त्रासदायक ठरेल याची शक्यता वाटल्याने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने ठरवलेला उमेदवारच पळवायची रणनिती आखली जात आहे. तर दुसरीकडे त्यासाठीचे वातावरण तयार करायला वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे सोबतीचे काम करू लागली आहेत. हे चित्रच पुरोगामी महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. अर्थात हे राजकारण आहे, यात जो जिंकेल तोच राजा असतो. त्यामुळे जे ग्रामपंचायतीत घडते, सोसायटीत घडते, वाड्यावस्त्यांवर घडते, ते आमदारकी, खासदारकीसाठी घडू लागल्याचे नवल वाटून घ्यायचे का? असाच प्रश्न पडू लागला असून तरीही लोकशाहीच्या डोळ्यादेखत चिंधड्या उडत असताना अशा गोष्टीकडे त्रयस्थ म्हणून पाहायचे का? हाही एक प्रश्न आहे.
अंधेरी कशाही पध्दतीने जिंकून महाराष्ट्रातील जनतेचा रोष कमी करायचा व आमच्याच बाजूने जनमत दाखवायचे याची रणनिती महाशक्तीची आहे. मात्र अशात शिंदे गट बरोबर घेतला अथवा पाठिंबा घेतला, तरीही उपयोग होणार नाही. तसेच तो विरोधात लढूनही उपयोग नाही. लटके यांना मतदारांची सहानुभूती असेल, तर लटके यांनाच पक्षात घेण्याची ही वेळही नाही. अशावेळी थेट शिंदे गटालाच उमेदवारी देऊन आपल्यावरही काही बालंट येणार नाही याची काळजी घ्यायची आणि दुसरीकडे शिंदे गटाला परप्रांतिय मतदारांचे मोठे पाठबळ देऊन, वेळप्रसंगी लटके यांनाच अमिषे दाखवून शिंदे गटानेच उमेदवारी द्यावी यासाठी जो पडद्यामागील रंगमंच सजला आहे, त्याने पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराच्या सगळ्या मर्यादा संपून गेल्या आहेत हे वेगळे सांगण्याची आता गरजच उरली नाही.
फक्त त्यातल्या त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवेन तर मशाल या चिन्हावरच आणि आमची निष्ठा उध्दव ठाकरेंवरच असे सांगून या अस्वस्थतेच्या रणांगणात ठाकरे गटासाठी थोडी धुगधुगी ठेवली, मात्र राजीनामा स्विकारलाच गेला नाही, तर काय? दुसऱ्या उमेदवाराला शिवसेनेच्या ठाकरे गटातून मतदार स्विकारतील का? तर दुसऱ्या उमेदवाराला तेवढे स्विकारणार नाहीत, म्हणूनच लटके कशा निवडणूक लढवणार नाहीत याचीही रणनिती सध्या वेग पकडताना दिसत आहे.
या एकूणच राजकारणात महाराष्ट्रात अंधेरी नगरी. चक्रावलेली प्रजा असेच चित्र दिसत असून या खालावलेल्या राजकारणाचे गावपातळीवर, वाड्यावस्त्यांवर व एकूणच कुटुंबांवरही काय परिणाम होतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.