पुणे : महान्यूज लाईव्ह
फेसबुक वर अनेकांना पेजवर असलेली फॉलॉवर्सची संख्या अचानक कमी दिसून येत असून फेसबुक अचानक गंडलय का ? असा सवाल अनेकांनी व्यक्त केला आहे. खुद्द मार्क झुकेरबर्ग यालाही याचा फटका बसल्याचे दिसत असून, त्याचेही फॉलोअर्स घटून फक्त 9997 पर्यंत दिसत असल्याची चर्चा सुरू आहे. या अचानक झालेल्या प्रकाराने फेसबुक वापरणाऱ्यांची गोची झाली आहे.
फेसबुक हे सोशल मीडियावर सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर अनेकांना अचानक असणाऱ्या फॉलॉवर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली पहावयास मिळत असून त्याचा फटका अनेकांना बसला आहे.ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अलका धुपकर यांसह अनेकांनी फटका बसला असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी देखील अचानक झालेल्या या बदलाने चिंता व्यक्त केली असून काहींची अगदी ५० हजारांची फॉलॉवर्स संख्या घटून नऊ हजार दरम्यान कमी होत असल्याने तांत्रिक अडचण झालीय की फेसबुकवर मुद्दाम काही सुरू आहे? याबाबत फेसबुकवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.