नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील दुर्गम दरेवाडी गावातील पोरांनी काढलेला मोर्चा राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर जळजळीत अंजन घालणारा असाच आहे. येथील ४३ विद्यार्थ्यांनी आपली शाळेची दप्तरे जिल्हा परीषदेकडे जमा करायचे ठरवले आहे आणि आता आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच, शेळ्या वळायला द्या अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच ही शाळा बंद करू नये म्हणून दरेवाडीच्या पालकांनी पायी इगतपुरी येथे जाऊन आंदोलन केले होते. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी दरेवाडीची ही शाळा बंद करणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र तरीही शाळा बंद करण्यात आली.
भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी गावानजिक भाम धरण झाले आहे. यावेळी या गावातील रहिवाशांना अर्ध्या किलोमीटर अंतरावर नव्याने गाव वसवून तेथे विस्थापित करण्यात आले. मात्र गावातील ३० ते ३५ कुटुंब विस्थापित होण्यास तयार नव्हते. मग ती कुटुंबे तेथेच राहीली. त्या कुटुंबात आता ४३ विद्यार्थी आहेत.
मात्र सर्व शिक्षा अभियानानुसार किमान एक किलोमीटर अंतरात शाळा असलीच पाहिजे असे बंधन आहे. आता अर्ध्या किलोमीटर अंतरावरच या मुलांसाठी विस्थापित गावात शाळा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्यात आली. मात्र आम्ही राहतो, तिथेच शाळा असली पाहिजे अशी या पालकांची व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
त्यामुळे बंद केलेली शाळा तरी चालू करा, नाहीतर शेळ्या तरी वळायला द्या असे म्हणत ही मुले जिल्हा परीषदेकडे निघाली आहेत. आपले दप्तर पाठीला लावून व सोबत शेळ्या घेऊन ही मुले नाशिकच्या दिशेने निघाली आहेत. प्रशासनाचा निषेध करताना आपली शाळेची दप्तरे झेडपीच्या सीईओंकडे जमा करणार असून आता आम्हाला शाळा नको, आम्हाला शेळ्या द्या अशी मागणी करणार आहेत.