सुरेश मिसाळ- महान्यूज लाईव्ह
इंदापूर – राज्यातील २० पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या जिल्हा परीषदेच्या शाळा बंद करण्याचा अथवा त्या शेजारील शाळेत समायोजित करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्या अंतर्गत माहिती मागवली असून पुणे जिल्ह्यात अशी वेळ आल्यास १ हजार ५० शाळा बंद होऊ शकतात.. त्यामुळे सध्यातरी शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.
सन २०२२-२३ मध्ये १ ते २० पर्यंत विद्यार्थी असलेल्या एकट्या पुणे जिल्ह्यात १ हजार ५० शाळा आहेत. त्यातही १ ते ५ पर्यंतच विद्यार्थी जिथे शिकतात, अशा जिल्ह्यात १६१ शाळा आहेत. या शाळा असून आणि नसूनही सारख्याच आहेत. मात्र १६ ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळादेखील काही कमी नाहीत. त्या जिल्ह्यात ३४६ एवढ्या आहेत. तर ६ ते १० पर्यंत विद्यार्थी असलेल्या शाळांची संख्या २१३ आहे. ११ ते १५ पर्यंत विद्यार्थी असलेल्या शाळा ३३४ आहेत.
याचा एकंदर विचार करता १ हजार ५० शाळा या अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १६१ शाळांचा तर पुरता बिघाडच झालेला आहे. ज्या कधीच सुधरू शकणार नाहीत. मात्र तरीदेखील शासनाने जो निर्णय विचाराधीन चालवला आहे, त्यानुसार राज्यातील मराठी शाळा, मोफत शाळा हा पॅटर्न कायमचा बंद करण्यासाठीच तर हे आडपडद्याने उचललेले पाऊल नाही ना अशी शंका शिक्षकांना आहे.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील ज्या तालुक्यात सर्वाधिक कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. त्या्ंची तालुका व त्यातील शाळांची माहिती पुढील प्रमाणे, सर्वाधिक शाळा भोर तालुक्यात १४३ असून त्याखालोल खेड तालुका १२८ शाळा, मुळशी ११९ शाळा, इंदापूर तालुका ५३ शाळा, आंबेगाव तालुका ९६ शाळा, बारामती ३१ शाळा, दौंड तालुक्यात ३८ शाळा, हवेलीत २१ शाळा, जुन्नर तालुक्यात ८५ शाळा, मावळात ८८ शाळा, पुरंदर तालुक्यात ६६ शाळा, शिरूरमध्ये ८४ व वेल्ह्यात ९४ शाळा अशा आहेत.