दिल्ली – महान्यूज लाईव्ह
अलिकडे निवडणूका आणि जाहीरनामे ही हवेतीलच गोष्ट बनली आहे. ज्यावेळी भाजपने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा हे सूत्र धरून शेतीमालाचा भाव जाहीर करू असे आश्वासन दिले..नंतर हा चुनावी जुमला होता असे सांगितले, तेव्हापासून तर यावरील विश्वासच उडला आहे. मात्र हरियाणा राज्यातील सिरसाढ गावच्या जयकरण लठवाल या उमेदवाराने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी अरूण बोथरा यांनी ट्विट करून या गावात मी रहायला जाणार आहे असे सांगितल्याने तर याची चर्चा अधिकच झाली आहे.
Am shifting to this village 🤣 pic.twitter.com/fsfrjxbdLc
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) October 9, 2022
सिरसाढ गावात ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. या गावात सरपंचपदासाठी जयकरण लठवाल हे उमेदवार उभे राहणार आहेत. भावी उमेदवार अशी आपली गणना करीत लठवाल यांनी जाहीरनामा एका फ्लेक्स फलकावर जाहीर केला आहे.
यामध्ये त्यांनी आपल्याला सरपंचपदासाठी निवडून दिले, तर आपण गावात तीन विमानतळ उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. तर महिलांसाठी फ्री मेकअप किट, २० रुपयांना प्रतिलिटर पेट्रोल, जीएसटी माफ, गॅस सिलिंडर अवघ्या १०० रुपयांत देऊ असे आश्वासन दिले आहे.
एवढ्यावर न थांबता त्यांनी सिरसाढ ते दिल्ली या अंतरावर मेट्रो सुरू करू असे आश्वासन दिले आहे. यापेक्षाही कळस म्हणजे गावच्या चावडीवर दररोज सरपंचांकडून मन की बात कार्यक्रम असणार असा कळसाध्याय करणारा शब्द त्यांनी गावकऱ्यांना दिला आहे.