बारामती – महान्यूज लाईव्ह
टोलनाक्यावर उभा राहून दमदाटीने गाड्या सोडायला लावणारा, आपली यंत्रणा रातच्या बारा वाजता सुरू होते, म्हणत गावातील कथित गैरकारभाराविरोधात दर पाच मिनीटांनी सोशल मिडियावर ठेकेदार व ग्रामपंचायतीविरोधात काहीबाही लिहीणारा बारामती तालुक्यातील वाघळवाडीचा दादूशेठ अगदी राज्यात फेमस झाला. पण या फेमस होण्याच्या नादात गावगुंडीच्या जाळ्यात अडकला… त्याने ग्रामसेवकाला मागील महिन्यात ९ सप्टेंबर २०२२ ते १२ सप्टेंबर २०२२ दरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरून ग्रामसेवकाने त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली.
यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी अधिक माहिती दिली. वाघळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नरसिंग दौलत राठोड यांनी प्रदीप उर्फ दादू भगवान मांगडे याच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा ते १२ सप्टेंबर २०२२ दरम्यान ग्रामपंचायतीत काम करीत असलेल्या राठोड यांच्या कार्यालयाला बाहेरून कडी लावली. राठोड त्यावेळी बाहेर उभे होते.
ठेकेदाराची बिलेच कशी काढतो ते बघतो, ऐ भाऊसाहेब, तुला किती फोन केले, तू फोनच उचलत नाही, असे म्हणत राठोड यांना जातीचा उल्लेख करून तुला गावात काय नुसता पगार घ्यायला बसवले आहे का? असे म्हणून पहिले माझ्या अर्जाची माहिती दे, नाहीतर तुला कामच करू देणार नाही. तझ्याकडे बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला.
त्यानंतरही मांगडे याने त्याच्याकडील फोनवरून सातत्याने फोन करून विकासकामांमध्ये ठेकेदार लोकांकडे कमिशन घेता, त्यांची बिले काढता. तुमची चौकशी लावली आहे, तु ठेकेदारांची बिलेच काढ, तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली. ग्रामसेवकाच्या विरोधात वरिष्ठा्ंकडे दिलेले अर्ज मागे घ्यायचे असतील, तर मला ५ हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्याविरोधात मी सगळीकडे तक्रारी करीन व तुम्हाला कामाला लावेन अशी धमकी दिली.
त्यानंतर आपले वाघळवाडी या डिजीटल पाटीचे दीड लाख रुपयांचे बील राजू गायकवाड यांच्या नावावर काढा व पैसे मला द्या असे म्हणून राठोड यांना खंडणी मागितली अशा स्वरुपाची फिर्याद राठोड यांनी दिली. त्यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.